मधुकर ठाकूर
उरण : उरण पुर्व विभागातील गावं, परिसरातील विविध कंटेनर यार्ड आणि व्यवसायिकांना विद्युत पुरवठा करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी आठ कोटी रुपये खर्च करून टाकण्यात आलेली उच्च दाबाची केबल चोरट्यांनी अंधारात कापून पळवून नेली आहे.यामुळे महावितरणमध्ये खळबळ उडाली आहे.
उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील गावे, व्यावसायिक, कंटेनर यार्ड यांना करण्यात येणारा वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे.याचा विपरीत परिणाम नागरिक व व्यावसायिकांवर होत आहे. त्यामुळे या विभागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वारंवार महावितरण कार्यालयाकडे मागणी केली होती.मागणीनंतर महावितरणने दोन वर्षांपूर्वी सुमारे आठ कोटी खर्च करून नव्याने उच्च दाबाच्या केबल्स टाकण्यात आल्या होत्या.परंतु खोपटा पुलावरून टाकण्यात आलेली उच्च दाबाच्या केबल्स बुधवारी ( २४) रात्रीच्या अंधारात अज्ञात चोरट्यांनी कापून नेल्याची घटना घडली आहे.कोट्यावधी रुपये खर्च करून टाकण्यात आलेली उच्च दाबाची केबल चोरून नेल्याने महावितरणमध्ये खळबळ माजली आहे.याबाबत उरण महावितरणचे अति. कार्यकारी अभियंता विजय सोनावले यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.त्यामुळे नेमक्या वस्तुस्थितीची माहिती मिळाली नाही.