नवा मोबाइल हाती पडलाय; आता बालकांची माहिती झटपट भरणार!
By निखिल म्हात्रे | Published: April 7, 2024 12:19 PM2024-04-07T12:19:06+5:302024-04-07T12:19:28+5:30
रायगड जिल्ह्यातील अंगणवाडीसेविका झाल्या ‘स्मार्ट’
अलिबाग : अंगणवाडी संबंधित माहिती अपडेट करण्यासाठी सेविकांना स्मार्ट मोबाइल देणार, असे आश्वासन शासनाने दिले होते. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील सेविका आणि पर्यवेक्षिकांना असे मोबाइल देण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे आता कामे ‘स्मार्ट’ पद्धतीने होणार आहेत. एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत प्रत्येक गावात अंगणवाड्यांचे कामकाज चालते. या ठिकाणी सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना शिकवले जाते.
तसेच सेविकांवर अनेक शासकीय कामांची जबाबदारी असते. या कामांची नोंद मोबाइलवरील ॲपमधून करण्यात येते. पण, अनेक वर्षे वापरात असल्याने जुना मोबाइल वापरताना अडचणी येत होत्या. त्यामुळे सेविकांनी हे मोबाइल परत केले होते. नव्या मोबाइलसाठी कामबंद आंदोलनही पुकारले होते. त्यामुळे अंगणवाडीसेविकांचे हे काम ठप्प होते.
नवा स्मार्ट मोबाइल दिल्यानंतरच हे काम सुरू करण्यात येईल, असा इशारा अंगणवाडीसेविकांनी दिला होता. त्यामुळे शासनाने आता स्मार्ट मोबाइल देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हे मोबाइल अंगणवाडीसेविकांना वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडीसेविकांना हे मोबाइल देण्यात आले असून, त्यांनी काम सुरू केले आहे.
रायगड जिल्ह्यात ३ हजार ९८ अंगणवाड्या आहेत. येथील सेविकांना जुन्या मोबाइलमुळे काम करताना अडचणी येत होत्या. नवीन मोबाइलच्या मागणीसाठी काम बंद आंदोलनही केले होते. त्यानंतर आता हे स्मार्ट फोन आम्हाला मिळाले आहेत. आता ते प्रत्यक्षात वापरल्यावरच त्याची गुणवत्ता कळणार आहे.
- जीविता पाटील, अंगणवाडीसेविका