वळवलीमध्ये पाण्याची नवीन टाकी बांधणार; पंधरा दिवसांत कामाची निविदा काढणार
By निखिल म्हात्रे | Published: January 11, 2024 02:19 PM2024-01-11T14:19:42+5:302024-01-11T14:20:02+5:30
लोकमत न्युज नेटवर्क अलिबाग : वळवली गावात जल जीवन योजनेचे काम सुरू होते. मात्र, ठेकेदाराने जुन्याच टाकीला रंगरंगोटी करून ...
लोकमत न्युज नेटवर्क
अलिबाग : वळवली गावात जल जीवन योजनेचे काम सुरू होते. मात्र, ठेकेदाराने जुन्याच टाकीला रंगरंगोटी करून योजना मार्गी लावण्याचा घाट घातला होता. त्यामुळे येथील महिलांनी आक्रमक भूमिका घेत त्याला विरोध केला. नवीन टाकी बांधण्यात यावी, अशी मागणी केली होती. याची दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली असून, लवकरच नवीन पाण्याच्या टाकीची कामाची निविदा काढली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
बेलोशी ग्रामपंचायत हद्दीतील वळवली येथे २३० घरांची वस्ती आहे. या गावाची लोकसंख्या ९०० हून अधिक आहे. आदिवासीवाडीत २० वर्षे जुन्या दोन पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्यांद्वारे उमटे धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. गावातील जुन्या टाक्या जीर्ण झाल्याने त्यांची वारंवार डागडुजी करावी लागत आहे. गावासाठी सुमारे ९७ लाख रुपयांची जल जीवन योजना मंजूर झाली आहे. या योजनेमार्फत गावातील नागरिकांना मिळणारे पाणी जुन्या टाकीद्वारेच दिले जाणार आहे. या टाक्या नादुरुस्त होण्याचा धोका कायमच संभवत आहे.
जीर्ण झालेल्या टाकीच्या जागी नवीन टाकी बांधण्यात यावी, अशी मागणी वळवली येथील महिलांनी केली. याबाबत १९ डिसेंबरला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांची भेट घेतली होती. महिलांच्या या मागणीची दखल घेत प्रशासन तातडीने कामाला लागले.
प्रत्यक्ष भेट देत केली पाहणी
पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता निहाल चवरकर यांनी प्रत्यक्ष वळवली गावात जाऊन तेथील महिलांची भेट घेऊन समस्या जाणून घेतली. येत्या पंधरा दिवसांत नवीन टाकीसाठी कामाची निविदा काढली जाणार असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले. त्यानुसार जल जीवन मिशन योजनेसाठी नवीन टाकी बांधली जाणार असल्याने महिलावर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
वळवली येथील महिलांच्या मागणीनुसार, पाण्याच्या टाकीचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. सीएसआर फंडातून ही टाकी बांधली जाणार आहे. पंधरा दिवसांत त्याची वर्क ऑर्डर निघेल.
- निहाल चवरकर, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, अलिबाग पंचायत समिती