मराठमोळ्या प्राचीन इराणचे अभ्यासक शैलेक्ष क्षीरसागर यांच्यावर कौतुकाची थाप
By वैभव गायकर | Published: May 30, 2023 04:06 PM2023-05-30T16:06:46+5:302023-05-30T16:06:59+5:30
भारतातील या लिपीचे जाणकार म्हणून शैलेश क्षीरसागर यांनी ऑनलाईन पद्धतीने पाकिस्तानातील सहभागी जणांना प्रशिक्षण दिले
पनवेल - भारत पाकिस्तान संबंधाबाबत नेहमीच चर्चा होत असते.भारत पाकिस्तानचे संबध तसे टोकाचेच आहेत.मात्र प्राचीन क्यूनिफॉर्म लिपीचे अभ्यासक असलेले मराठमोळे शैलेश क्षीरसागर यांच्यावर पाकिस्थानातील नामांकित गांधार रिसर्च सेंटर या संस्थेकडून कौतुकाची थाप देण्यात आली आहे.याबाबत या संस्थेने तशापद्धतीचे प्रशस्तिपत्रक क्षीरसागर यांना देऊ केले आहे.
तक्षशिला येथील धर्मराजिक स्तूप आणि पाकिस्तानातील इतर इस्लामपूर्व काळातीलप्राचीन वास्तूंची दुरुस्ती सुरु करणारे गांधार रिसोर्स सेंटर आणि सेंटर फॉर कल्चर अँड डेव्हलपमेंट यांनी पाकिस्तान नॅशनल कमिटी ऑफ इंटरनॅशल कौंसिल्स ऑफ म्युझियम्स यांच्या सहकार्याने पाकिस्तानात 2500 वर्षे प्राचीन क्यूनिफॉर्म लिपीच्या शिक्षणाचा 10 आठवड्यांचा अभ्यासक्रम आयोजित केला होता.
भारतातील या लिपीचे जाणकार म्हणून शैलेश क्षीरसागर यांनी ऑनलाईन पद्धतीने पाकिस्तानातील सहभागी जणांना प्रशिक्षण दिले. या अभ्यासक्रमात महबलूस असाद, कैनात बलोच, पाणिनी लँग्वेज रिसर्च सेंटरचे भाषातज्ज्ञ डॉ. झहीर भट्टी, पाकिस्तान नॅशनल कमिटी ऑफ इंटरनॅशल कौंसिल्स ऑफ म्युझियम्सच्या सचिव इझ्हा खान, डॉ नदीम, खैझीना खान, शर्मिन जमील आणि झहीर अली ह्यांनी नोंदणी केली होती. ह्या अभ्यासक्रमात पाकिस्तानातील विविध भाषातज्ज्ञ, इतिहासाचे संशोधक सहभागी झाले होते. अभ्यासक्रमात पाकिस्तानी विद्वान आणि पाणिनी लँग्वेज रिसर्च सेंटर येथील ज्येष्ठ भाषातज्ज्ञ असलेले डॉ. अमीर भट्टी यांनी विशेष प्राविण्य मिळविले. इस्लामपूर्व काळातील प्राचीन इराणमध्ये इसपू 500 च्या सुमारास क्यूनिफॉर्म लिपी ही प्राचीन पर्शियन भाषेसाठी वापरली जात असे. ह्या काळात इराणमध्ये अकेमेनिड राजघराण्याचे राज्य होते.
हा काळ अलेक्झांडर द ग्रेट आणि भारतातील सम्राट अशोकच्या सुमारे 300 वर्षे आधीचा काळ होता. थोडक्यात अकेमेनिड राजघराण्याच्या प्राचीन इराणमधील राज्याचा काळ हा साधारणतः भारतातील गौतम बुद्धाच्या समकालीन होता. अकेमेनिड राजघराण्याचे 100 हून अधिक शिलालेख ह्या लिपीत लिहिले आहेत. प्राचीन पर्शियन आणि अवेस्ता ह्या प्राचीन इराणमधील भाषा असून भारतातील संस्कृत भाषेचे आणि ह्या इंडो-इराणियन भाषांचे उगम असलेल्या प्रोटो इंडो-इराणियन नामक भाषेमुळे ह्या सर्व भाषांत बरीच समानता आढळून येते. यापैकी अवेस्ता ही पारशी लोकांचा पवित्र धर्मग्रंथ अवेस्ताची भाषा असून ती वैदिक संस्कृतच्या अत्यंत निकट आहे. शैलेश क्षीरसागर ह्यांनी मुंबई विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण विभागातून पुरातत्त्वाचा अभ्यास डॉ. कुरुष दलाल आणि डॉ. मुग्धा कर्णिक ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला आहे. यापूर्वी भारतात इंडिया स्टडी सेंटर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग - नाशिक आणि अमेरिकेत शिकागो महाराष्ट्र मंडळ येथे ऑनलाईन व्याख्याने प्राचीन इराण ह्या विषयावर क्षीरसागर यांनी दिलेली आहेत.
गांधार सेंटरचे मुख्य काम काय ?
पाकिस्तानच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाची जाणीव तेथील लोकांना करुन देणे. ह्यांतर्गत ह्या संस्थेने निरनिराळ्या स्तूपांचे पुनरुज्जीवन करणे तसेच बुद्धपौर्णिमेचा कार्यक्रम देखील तेथे साजरा करणे अशा उपक्रमांना सुरुवात केली आहे. नेपाळ, कोरिया, चीन, श्रीलंकेतून आलेल्या लोकांना आजच्या पाकिस्तानात असलेल्या ह्या प्राचीन वारशाची ओळख व्हावी असा त्यांनी प्रयत्न सुरु केला आहे. डॉ. नदीम तरार हे एक प्रमुख असून त्यांनी उत्साहीपणे पाकिस्तानच्या प्राचीन इतिहासावर अनेक आंतरराष्ट्रीय परिषद तेथे आयोजित केल्या आहेत. ह्या अंतर्गत पहिल्यांदाच येथे प्राचीन भाषेचा परिपूर्ण अभ्यासक्रम आयोजित झाला होता, ज्यात मार्गदर्शक- शिक्षक म्हणून भारतातून शैलेश क्षीरसागर हे होते.