चिर्लेतून एलिव्हेटेड कॉरिडॉर एक्स्प्रेल वेला जोडण्याचा प्रस्ताव; १३५२ कोटी खर्चाचा प्रकल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 10:07 AM2023-03-12T10:07:17+5:302023-03-12T10:07:34+5:30
भविष्यात वाहतूक सहजसुलभ होण्यासाठी प्रकल्प : लोणावळा -खंडाळा -मुंबई दरम्यानचा प्रवास आणखी ९० मिनिटांनी कमी होण्याचीही शक्यता !
मधुकर ठाकूर
उरण : जेएनपीए बंदरातुन प्रचंड होणाऱ्या अवजड मल्टी एक्सल कंटेनर ट्रकच्या वाहतुकीचा व वाहतूक कोंडीचा नव्याने तयार करण्यात येत असलेल्या मुंबई ट्रान्स-हार्बर लिंकवरील ताण कमी करण्याचा एक प्रयत्न म्हणून मुंबई ट्रान्स-हार्बर लिंकच्या चिर्ले टोकापासून ते गव्हाणफाटा आणि पळस्पे फाटा ते मुंबई पुणे द्रुतगती मार्गापर्यंत सात किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गाशी जोडण्यात येणाऱ्या प्रस्तावित १३५२ कोटी खर्चाच्या कामामुळे या मार्गावरील वाहतूक आणखी सहजसुलभ होणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी शुक्रवारी दिली.
काय आहे प्रस्तावित प्रकल्प
देशातील सर्वात मोठ्या मुंबई ट्रान्स-हार्बर लिंकमुळे मुंबईतुन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई-पुणे-गोवा महामार्गाशी जोडणाऱ्या भागांशी अवघ्या २० मिनिटांत पोहचता येणार आहे. मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक व जेएनपीएच्या वाढत्या अवजड कंटेनर मालाच्या वाहतूकमुळे भविष्यात तयार करण्यात येत असलेल्या या मार्गावर वाहतूक कोंडींचे अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून हा नियोजित कामाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.या प्रस्तावित प्रकल्पाअंतर्गत मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग ते चिर्ले येथील मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक एमटीएचएल इंटरचेंजपर्यंत एलिव्हेटेड कॉरिडॉरचे बांधकाम करण्यात येणार आहे.
तीन भागात काम
पहिला भाग-:
सध्याच्या एनएच-३४८ च्या मध्यभागी चिर्ले इंटरचेंज ते गव्हाणफाटा पर्यंत सहा लेनचा उन्नत कॉरिडॉर प्रदान करण्यात येणार आहे. ज्यामध्ये मध्य रेल्वे मार्गाच्या पनवेल - उरण विभागात आरओबी प्रदान करणे समाविष्ट आहे. यामध्ये गव्हाणफाटा येथील डबल डेकर एलिव्हेटेड कॉरिडॉरचाही समावेश आहे.
दुसरा भाग-:
सध्याच्या एनएच-४८ च्या मध्यभागी पळस्पे फाटा ते मुंबई पुणे एक्स्प्रेस-वे पर्यंत सहा लेनचा उन्नत कॉरिडॉर प्रदान करण्यात येणार आहे. ज्यामध्ये मध्य रेल्वे मार्गाच्या पनवेल- रोहा विभागात आरओबी प्रदान करण्याच्या कामाचा समाविष्ट आहे.
तिसरा भाग:-
मुंबई पुणे द्रुतगती मार्ग ते मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक पर्यंत रहदारीसाठी २ लेनचा युपी रॅम्प प्रदान करण्यात येणार आहे.तसेच मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर विद्यमान व्हीओपीचे रुंदीकरण,जुन्या मुंबई-पुणे महामार्गापासून विद्यमान एनएच-४८ पर्यंतच्या रहदारीसाठी दोन लेन अप आणि डाऊन रॅम्प प्रदान करण्याच्या कामाचाही समाविष्ट करण्यात आला आहे.तसेच सध्याच्या एनएच-४८ पळस्पे फाटा ते मुंबई पुणे द्रुतगती मार्ग सिमेंट काँक्रीट फुटपाथमध्ये रुंदीकरण आणि सुधारणाही केल्या जाणार आहेत.
आवश्यक जमीन:-
एकूण ४.७४ हेक्टर जमीनीवर हा प्रस्तावित प्रकल्प उभारण्यात येणार आहे.यामध्ये ०.२३६ हेक्टर वनजमिनींचाही आहे.
प्रस्तावित प्रकल्पामुळे होणारे फायदे :
प्रस्तावित एलिव्हेटेड कॉरिडॉर मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक रोडपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेपर्यंत सुरळीत वाहतूक व्यवस्था प्रदान करणारे आहे.मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक रस्ता एनएच-३४८ वर चिर्ले जंक्शन येथे संपतो. एनएच-३४८वर नेहमीच अवजड रहदारी असते. विशेषत: जेएनपीए बंदरामुळे मल्टी एक्सल कंटेनर ट्रकची, त्यामुळे मुंबई ट्रान्स-हार्बर लिंकवर ट्रॅफिक जाम न होता सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक ट्रॅफिक विलीन करण्यासाठी आवश्यकतेनुसार मदत मिळणार आहे.त्यामुळेच चिर्ले येथील मुंबई ट्रान्स-हार्बर लिंकच्या टोकापासून ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्गापर्यंत प्रस्तावित विकास केला जाणार आहे.या प्रस्तावित कामामुळे वाहतूक मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, गोवा महामार्गावर सहज आणि द्रुतपणे प्रवेश करू शकते.या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.पळस्पे ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा एलिव्हेटेड कॉरिडॉर रसायनी जंक्शनच्या पलीकडे सुरू आहे आणि त्यामुळे रसायनी जंक्शनवरील मुख्य कॅरेजवे वाहतूक संघर्षमुक्त होणार आहे.लोणावळा -खंडाळा -मुंबई दरम्यानचा प्रवास आणखी ९० मिनिटांनी कमी होणार आहे.नवी मुंबईतील अरुंद लेन कनेक्टिव्हिटीमुळे निर्माण होणारी अडचण दूर होईल आणि मुंबई आणि पुणे दरम्यान वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
प्रकल्पाचा खर्च
७.३५ किमी एकूण लांबी असलेल्या एलिव्हेटेड कॉरिडॉर महामार्गावरील मुंबई पुणे एक्सप्रेस वे जवळ ३ + ३ लेनच्या गल्ल्या तयार करण्यात येणार आहेत.
या प्रस्तावित प्रकल्पावर एकूण १३५१.७३ कोटी रुपये खर्च होणार आहे.या कामाच्या निविदाही मागविण्याची तयारीही सुरू करण्यात आली आहे.