उरणमध्ये जखमी अवस्थेत आढळलेल्या एका दुर्मिळ गोल्डन जॅकलला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2022 10:23 PM2022-10-31T22:23:40+5:302022-10-31T22:23:50+5:30
Raigad News: उरण येथील खोपटा-करंजा कोस्टल रोडवर जखमी अवस्थेत आढळलेल्या एका दुर्मिळ गोल्डन जॅकलला वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने रेस्क्यु करुन पुढील उपचारासाठी पुण्यातील इस्पीतळात पाठविण्यात आले आहे.
- मधुकर. ठाकूर
उरण - उरण येथील खोपटा-करंजा कोस्टल रोडवर जखमी अवस्थेत आढळलेल्या एका दुर्मिळ गोल्डन जॅकलला वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने रेस्क्यु करुन पुढील उपचारासाठी पुण्यातील इस्पीतळात पाठविण्यात आले आहे. यामुळे दुर्मिळ गोल्डन जॅकलला जीव वाचविण्यात यश आले आहे.
उरण येथील खोपटा-करंजा कोस्टल रोडच्या दुतर्फा जागेत खारफुटी,कांदळवनाची जंगलं आहेत.या परिसरात रानडुक्करांबरोबरच गोल्डन जॅकलच्या कळपांचीही रेलचेल असते.खारफुटी,कांदळवनांच्या जंगलात खेकडे, मासळी आदी आवडणारे खाद्य विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने त्या ठिकाणी गोल्डन जॅकल कळपाने शिकारीला येतात. सोमवारी (३१) दुपारच्या सुमारास असाच एक गोल्डन जॅकल जखमी अवस्थेत रस्त्यावर आढळून आला.त्याच रस्त्यावरुन जाणाऱ्या प्रेमानाथ भोईर या गृहस्थाने त्वरित वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी,तसेच फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेचे सदस्य निकेतन ठाकूर ,महेश भोईर, शिवप्रसाद भेंडे यांना माहिती देऊन पाचारण केले.
वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेत एका नाल्यात अडकून निपचित पडलेल्या गोल्डन जॅकलला मोठ्या प्रयासाने रेस्क्यु केले.जखमी गोल्डन जॅकलची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली.माहिती मिळताच उरण विभागाचे आरएफओ नथुराम कोकरे त्यांचे सहकारी भाऊसाहेब, संजय म्हात्रे ,सुप्रिया कसबे यांनी घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी गोल्डन जॅकलची प्राथमिक तपासणी केली.तपासणीत त्याला मागील बाजूस मार लागल्याचे आढळून आले.त्यामुळे गोल्डन जॅकलला तत्काळ पुढील उपचारासाठी पुण्यातील रेस्क्यु इस्पीतळात पाठविण्यात आले असल्याची माहिती उरण विभागाचे आरएफओ नथुराम कोकरे यांनी दिली.
गोल्डन जॅकल भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सकाळच्या सुमारास जखमी झाले असावे.त्यानंतर घाबरून बिथरलेल्या जॅकलने नाल्यात आश्रय घेतला असावा.गोल्डन जॅकल वाहनाच्या धडकेत की आणखी कशामुळे जखमी झाला हे तपासणीनंतरच उघडकीस येईल असेही आरएफओ नथुराम कोकरे यांनी सांगितले.