- मधुकर ठाकूर
उरण : स्पांईटिंग कोब्रा, ग्रीन माम्बानंतर जेएनपीए परिसरातील ग्लोबीकॉन कंटेनर यार्डमध्ये अमेरिकेतुन आलेल्या एका कंटेनरमध्ये साडेतीन फूट लांबीचा ब्लॅक इग्वांना ( Black iguana or black spiny-tailed iguana )(Ctenosaura Similes) सरपटणाऱ्या प्राणी आढळून आला आहे.वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी यांनी त्याला शिताफीने पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले आहे.
भारतात आढळून न येणाऱ्या परदेशी ब्लॅक इग्वांनाला वन अधिकाऱ्यांनी सुरक्षिततेसाठी पुण्यातील रेस्क्यु इस्पीतळात पाठविण्यात आले आहे. अमेरिकेतील मेक्सिकोमधुन बुधवारी (२२) आलेला एक कंटेनर खोपटा येथील ग्लोबीकॉन कंटेनर यार्डमध्ये उतरविण्यात आला होता.कामगारांनी कंटेनर उघडताच त्यामध्ये एक पाली सारखा कधीही न पाहिलेला सरपटणाऱ्या प्राणी आढळून आला.त्यांनी वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी यांना पाचारण केले.
सर्पमित्र केणी यांनाही अशा रंगाचा प्राणी पहिल्यांदाच पाहाण्यात आल्याने आणि या निळसर रंगामध्ये प्राणी आपल्या भागात सापडतच नसल्याने अचंबित झाला. सर्पमित्र विवेक केणी यांनी ब्लॅक इग्वांना यांनी सुरक्षित पकडून उरण वनविभागाचे वनक्षेत्रपाल नथुराम कोकरे यांच्या स्वाधीन केले.आपल्या इथले वातावरण हे त्याला अनुकूल नसल्यामुळे त्याच्या जिविताला धोका संभवतो.त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून वनविभागानेही सुरक्षिततेसाठी पुण्यातील रेस्क्यु इस्पीतळात पाठविण्यात आले. दरम्यान याआधीही विदेशातून आयात करण्यात आलेल्या कंटेनरमधुन हजारो मैलांचे अंतरावरून स्पांईटिंग कोब्रा, ग्रीन माम्बा आदी भारतात कधीही आढळून न येणारे सरपटणारे प्राणी आढळून आले आहेत.त्यानंतर आता साडेतीन फूट लांबीचा ब्लॅक इग्वांना आढळून आला असल्याची माहिती विवेक केणी यांनी दिली.