मधुकर ठाकूर
उरण - आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात.मात्र विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना लिहिता वाचता यावे यासाठी येथील आश्रम शाळेतील एका शिक्षकाने स्वतःहून पुढाकार घेत शिक्षणाची ज्ञानगंगा आदिवासी वाडीपर्यंत हा अनोखा उपक्रम राबवत प्रत्येक रविवारच्या सुट्टीच्या दिवशी शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांना आश्रम शाळेत बोलावून त्यांना शिक्षणाचे धडे देण्याचा अनोखा उपक्रम येथील एका शिक्षकाने राबविला आहे. महादेव डोईफोडे असे या शिक्षकाचे नाव आहे. शिक्षणाची ज्ञानगंगा या त्यांच्या अभियानाद्वारे प्रबोधन व प्रात्यक्षिकेतून आदिवासी बांधवांसाठी ते शिक्षणाविषयीची जनजागृती करीत आहेत. या त्यांच्या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
उरण तालुक्यातील चिरनेर व पनवेल परिसरातील डोंगर दर्या-खोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी चिरनेर गावात आदिवासी आश्रम शाळेची निर्मिती करण्यात आली आहे. या आश्रम शाळेच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे आदिवासी मुलांचे शैक्षणिक भवितव्य उज्वल झाले आहे. मात्र काही प्रमाणात येथील आदिवासी मुलांच्या पालकांमध्ये साक्षरतेचा अभाव दिसून येत आहे. परिणामी या विद्यार्थ्यांच्या पालकांनाही लिहिता वाचता यावे यासाठी येथील आश्रम शाळेत १५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या महादेव डोईफोडे या शिक्षकाने स्वतःहून पुढाकार घेतला आहे.
शिक्षणाची ज्ञानगंगा आदिवासी वाडीपर्यंत हा अनोखा उपक्रम राबवत रविवारच्या सुट्टीच्या दिवशी शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांना आश्रम शाळेत बोलाविण्यात येते. त्यांना हाताला धरून शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.त्यांच्यामध्ये शिक्षणासाठी जनजागृती करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांनाही शिक्षित करण्याचा त्यांचा हा उपक्रम मागील काही महिन्यांपासून बिनबोभाटपणे सुरू आहे. त्याच्या या प्रयत्नातुन परिसरातील शेकडो आदिवासींना कामापुरते का होईना लिहिता वाचता येऊ लागले आहे. अंगठ्याच्या जागी स्वाक्षरी करु लागले आहेत.
विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न करता विद्यादानाचे मोलाचे काम करत आहेत. त्यांनी निस्वार्थी सेवेचा आदर्श इतरांपुढे ठेवला आहे. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. राजिपचे सदस्य बाजीराव परदेशी, उरण पंचायत समितीच्या माजी उपसभापती शुभांगी पाटील, सरपंच संतोष चिर्लेकर, उपसरपंच प्रियांका गोंधळी, तंटामुक्तीचे चिरनेर गाव अध्यक्ष अलंकार परदेशी, सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी, ग्रामपंचायतीचे सदस्य रमेश फोफेरकर, शितल घबाडी, सविता केणी, किरण कुंभार, मुख्याध्यापक आप्पासाहेब मोरे, शाळेचे शिक्षक व कर्मचारी तसेच चिरनेर ग्रामस्थ व आदिवासी बांधवांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कौतुक केले आहे.