मधुकर ठाकूर, उरण: पाच लाखांची आर्थिक नुकसान भरपाई, मृताच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी, जखमींना वैद्यकीय खर्च देण्याच्या नातेवाईकांना दिलेल्या लेखी आश्वासनानंतरच गुरुवारी (८) खोपटा येथे अपघातानंतर सुरू करण्यात आलेले रास्तारोको मागे घेण्यात आले.त्यानंतरच सकाळपासून या मार्गावरील सलग १० तास बंद पडलेली वाहतूक पुर्ववत सुरू झाली.
नवीमुंबई परिवहन सेवेची एक वातानुकूलित प्रवासी बस प्रवाशांना घेऊन जुईनगर येथून कोप्रोलीकडे निघाली होती. सकाळी १० वाजता सुमारास खोपटा गावाजवळ रस्त्यावरुन जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने एका मालवाहु टेम्पोसह तीन दुचाकींना जोरदार धडक दिली.या बसच्या धडकेत एक तरुणाचा मृत्यू झाला.तर एक इसम गंभीररीत्या जखमी झाला आहे.या अपघातानंतर संतप्त झालेले मृत, जखमींने नातेवाईक आणि जमलेल्या ग्रामस्थांच्या जमावाने या रस्त्यावरील धावणारी वाहतुकच बंद करून रास्ता रोको केले.
मृत आणि जखमी झालेल्या इसमांच्या कुटुंबातील आर्थिक नुकसान भरपाई देण्याचा निर्णय होत नाही आणि त्यांना न्याय हक्क मिळत नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी भूमिका घेतली.यामुळे सकाळी १० वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.वाहतुकच बंद करण्यात आल्याने या मार्गावर हजारो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
दरम्यान पहिल्या फेरीत उरणचे आमदार यांनी नातेवाईकांशी केली .मात्र फिस्कटलेल्या चर्चेतुन काही एक निष्पन्न झाले नाही.त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ताही मोकळा झाला नाही.फिस्कटलेल्या बैठकीनंतर दुसऱ्यांदा नवीमुंबई परिवहन सेवेचे अधिकारी,मृत ,जखमींचे नातेवाईक, पोलिस आदींच्या उपस्थितीत बैठक झाली.
बैठकीत झालेल्या चर्चेत मृताच्या कुटुंबाला आर्थिक नुकसान भरपाई, जखमींना वैद्यकीय खर्च आणि मृताच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरी देण्यावर सहमती नातेवाईकांनी संमती दर्शवली.यासाठी संबंधित विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतरच आश्वासनाची पुर्तता केली जाणार आहे. नातेवाईकांना दिलेल्या लेखी आश्वासनानंतरच सकाळ १० वाजता सुरू करण्यात आलेले रास्तारोको आंदोलन रात्री ८ वाजता मागे घेण्यात आले असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.नातेवाईकांनी रास्तारोको आंदोलन मागे घेतल्यानंतर तब्बल १० तासांनंतर या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली असल्याची माहिती उरण वाहतूक नियंत्रण शाखेचे उपनिरीक्षक संजय पवार यांनी दिली.