अलिबागमधील तरुणाला जिल्ह्यातच मिळणार रोजगार; आमदार महेंद्र दळवी यांची ग्वाही
By राजेश भोस्तेकर | Published: September 4, 2022 12:10 PM2022-09-04T12:10:43+5:302022-09-04T12:10:49+5:30
तरुण बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे करणार आयोजन
अलिबाग: रायगड हा औद्योगिक जिल्हा म्हणूनही गणला जातो. असे असले तरी जिल्ह्यात बेरोजगारीही वाढतच आहे. क्षमता आणि शैक्षणिक पात्रता असतानाही काही कंपन्या स्थानिकांना नोकरीपासून वंचित ठेवत आहेत. त्यामुळे रायगडातील तरुणाला शहराकडे धाव घ्यावी लागत आहे. जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना जिल्ह्यातच रोजगार संधी मिळावी यासाठी रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत. तरुणांना जिल्ह्यातच रोजगार मिळावा यासाठी काम करणार असल्याचे आमदार महेंद्र दळवी यांनी आश्वासन दिले आहे.
युवासेनेच्या माध्यमातून जिल्ह्यात रोजगार मेळावे घेतले जाणार असून मुलाखतीच्या ठिकाणीच नोकरीची शाश्वती या मेळाव्यातून येथील तरुणांना मिळणार आहे. या मेळाव्यांमध्ये विविध कंपन्यांचे अधिकारी, सरकारी अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. सध्या युवा सेनेचे सचिव ऍड. विराज म्हामुणकर यांचा कोकण दौरा सुरु आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक अलिबाग येथील राजमळा येथे शनिवार ३ सप्टेंबर रोजी पार पडली. या बैठकीत आमदार महेंद्र दळवी यांनी तरुणांना रोजगार मिळवून देण्याबाबत आश्र्वासित केले आहे .
अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजा केणी, युवानेते अभिराजशेठ दळवी, रोहा तालुका प्रमुख ऍड. मनोज शिंदे, अजय गायकर, मनोज पाटील, संकेत नाईक, संकेत पाटील, संदेश थळे आदी उपस्थित होते. या बैठकीत संघटना बांधणीसाठी भर देताना गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. संघटना वाढीबरोबरच बेरोजगारांच्या समस्या सोडवण्यावरही विशेष भर देण्यात येणार असल्याचे आ. महेंद्र दळवी यांनी सांगितले.
गणेशोत्सवानंतर नोकरी मेळावे, रोजगार मेळावे घेतले जाणार आहेत. यामध्ये विविध कंपन्यांचे अधिकारी, शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात शैक्षणिक पात्रता पुर्ण करणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असून याच ठिकाणी त्यांना नियुक्तीपत्रेही मिळण्याची शाश्वती आ. महेंद्र दळवी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिली.
शिंदे गटाचे तरुणाई लक्ष-
शिवसेना आणि शिंदे गट निर्माण झाला असल्याने दोन्ही गट आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तरुणाई ही शिवसेनेकडे अधिक वळलेली आहे. त्यामुळे शिंदे गटाकडूनही तरुणाईला आपल्याकडे खेचण्यासाठी विविध उपक्रमांतून प्रयत्न जिल्ह्यातही सुरू झालेले आहेत.