संजय गांधी योजनेचा डिसेंबर २०२३ पर्यंत ४५ हजार लाभार्थ्यांना आधार; खात्यात अनुदान जमा
By निखिल म्हात्रे | Published: February 10, 2024 05:48 PM2024-02-10T17:48:09+5:302024-02-10T17:48:37+5:30
सर्वसाधारण घटकातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 20 हजार 957 लाभार्थी
निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: आर्थिकदृष्ट्या दुर्बल, विधवा, तसेच निराधार असलेल्या ४५ हजार लाभार्थ्यांना डिसेंबर 2023 अखेर संजय गांधी योजनेचा आधार मिळाला आहे. या लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.
गोरगरीबांसह वृद्ध, विधवा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, दिव्यांग व्यक्तींना आर्थिक बळ मिळावे यासाठी सर्वसाधारण घटकासाठी संजय गांधी निराधार योजना, अनुसूचित जातीसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना, अनुसूचित जमातीसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना, सर्वसाधारणसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, अनुसूचित जाती, जमातीसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय दिव्यांग, अपंग निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य सरकारकडून केले जाते. केंद्र व राज्य सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात दीड हजार रुपयांप्रमाणे अनुदान जमा केले जाते.
या योजनेद्वारे जानेवारी ते डिसेंबर 2023 अखेरपर्यंत 45 हजार 570 लाभार्थ्यांना अनुदान दिले जात आहे. त्यात सर्वसाधारण घटकातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 20 हजार 957, अनुसूचित जमाती घटकातील संजय गांधी निराधार अनुदान योजेचे एक हजार 869 व अनुसूचित जाती घटकातील एक हजार 616 लाभार्थ्यांचा समावेश आहे. तर, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत 68 लाभार्थी असून, दिव्यांग निवृत्त वेतन योजनेत 286 लाभार्थ्यांनी लाभ घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.