टपाल खात्यामुळे मिळाली आधार कार्डे 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 12:59 AM2021-02-03T00:59:42+5:302021-02-03T01:00:15+5:30

Raigad News : रायगड जिल्हा डाक विभागाने २८ उपडाकघरांच्या साहाय्याने ग्रामीण भागात आतापर्यंत सात हजार ३८९ आधार कार्डांचे नूतनीकरण केले आहे.

Aadhar cards received by postal department | टपाल खात्यामुळे मिळाली आधार कार्डे 

टपाल खात्यामुळे मिळाली आधार कार्डे 

googlenewsNext

रायगड : रायगड जिल्हा डाक विभागाने २८ उपडाकघरांच्या साहाय्याने ग्रामीण भागात आतापर्यंत सात हजार ३८९ आधार कार्डांचे नूतनीकरण केले आहे. डाक विभागाने ग्रामिण भागांमध्ये यासाठी विविध ठिकाणी ४८ शिबिरे आयाेजित केली हाेती. त्याचा नागरिकांना चांगलाच फायदा झाल्याचे दिसून येते. आधार कार्ड काढल्यानंतर त्याची दुरुस्ती करता येते किंवा ती करणे गरजेचे असते. याबाबत ग्रामीण भागामध्ये जनजागृती झालेली नाही.

नवीन आधार कार्ड काढणे, अनेक वर्षांचे जुने आधार कार्ड नूतनीकरण करणे या प्रक्रियेपासून ग्रामीण भागातील जनता पूर्णपणे मागे आहे. आधार कार्ड पूर्णपणे अद्यावत नसण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. नवीन आधार कार्ड जसे मोफत आहे, तसेच मुलांचे वय वर्षे ५ व १५ झाल्यावर त्याचे बायोमेट्रिक (हाताचे ठसे) बदलणे, फोटो बदलणे गरजेचे असते, याची माहितीही ग्रामीण भागातील सर्वच नागरिकांना नाही. सुरुवातीला आधार कार्ड काढण्याचे सरकारने जाहीर केले, तेव्हा माेठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली हाेती. त्यामुळे आधार कार्डवर अनेक चुका झाल्या हाेत्या. त्यामध्ये प्रामुख्याने जन्म तारखेच्या जागी फक्त साल असणे, पत्ता चुकीचा असणे, नावात फरक असणे. या चुका सुधारण्यासाठी आधार कार्ड आद्यवत करणे गरजेचे हाेते. मात्र, याबाबत मोठी उदासीनता दिसत आहे. एखाद्या कामासाठी गरज लागत नाही, तोपर्यंत नागरिकांना आधार कार्डाचे महत्त्व कळत नाही.

गरज लागल्यानंतर त्यांची धावपळ सुरू हाेेते. त्यामुळे त्यांचा पैसा आणि वेळ या दोन्ही गोष्टीचा अधिक खर्च होतो. आज आनेक ठिकाणी नागरी सेवा केंद्र आहेत. मात्र, त्याच्याकडून याबाबत जनजागृती होताना दिसत नाही. सध्या ५० रु. ते १०० रु.मध्ये ही दुरुस्ती होत आहे. ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, समाजसेवक यांनी पूर्व नियोजन करून, अशा प्रकारचे शिबिर डाक विभागाच्या साह्याने आयोजित केले, तर नक्कीच नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येईल, अशी भावना रायगड विभागाचे जिल्हा डाकअधीक्षक उमेश जनवाडे यांनी व्यक्त केली. भारतीय डाक विभागाकडून मागणी असणाऱ्या ठिकाणी या शिबिराचे आयोजन केले जाऊ शकते, याचा फायदा सामाजिक संस्थांनी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 

जिल्ह्यातील आदिवासी समाजात अज्ञान
आदिवासी समाजात तर याबाबत भयंकर अज्ञान आहे. त्यामुळे त्या समाजात अनेक लहान मुलांची आधार कार्ड नसल्याचे वास्तव समाेर आले आहे. आधार कार्ड नसल्याने त्यांचा शाळा प्रवेशही होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे, त्यांच्या पालकांचे आधार कार्ड अद्यावत नसतात. त्यामुळे त्यांच्यासमाेर अनेक अडचणी निर्माण हाेतात. आधार कार्डवर असणारा फोटो, त्याला संलग्न असणारा मोबाइल नंबर आपल्याला केव्हाही बदलात येऊ शकतो. त्यामध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा आहे, त्यासाठी सरकारी फी फारच कमी असते, हे अनेकांना माहीत नाही.

Web Title: Aadhar cards received by postal department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.