महाड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य धनाजी गुरव यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयावर निलंबित प्राचार्या आरती वानखेडे यांच्या समर्थकांनी मोर्चा काढला. विशेष म्हणजे या मोर्चात शिवसेनेचे नेते देखील सहभागी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.मागील आठवड्यात न्यायालयाच्या आदेशानुसार डॉ. धनाजी गुरव पदभार स्वीकारण्यासाठी महाविद्यालयात गेले होते. पदभार स्वीकारल्यानंतर माजी प्राचार्या आरती वानखेडे यांच्याशी प्राचार्य गुरव यांची वादावादी झाली होती. शहर पोलीस ठाण्यात वानखेडे यांनी आपल्याला मारहाण करून विनयभंग केल्याची फिर्याद दाखल केली होती तर कल्पना महाडिक यांनीही वानखेडे यांच्याविरोधात तक्रार केली होती. मात्र आठ दिवसानंतरही धनाजी गुरव यांच्यावर पोलिसांनी कारवाई न केल्याच्या निषेधार्थ सोमवारी प्रांत कार्यालयावर शिवाजी चौकातून मोर्चा काढला. या मोर्चात शिवसेना उपजिल्हा प्रमुख विपीन म्हामुणकर, तालुका शिवसेना प्रमुख सुरेश महाडिक, जिल्हा परिषद सदस्य बाळ रावुळ, मधुकर गायकवाड, वंदना मोरे, राजू मांडे आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रांत कार्यालयाजवळ पोलिसांनी मोर्चा अडवला. मंडळाने प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी डीवायएसपी अंजली सोनावणे, पोलीस निरीक्षक नितीन जगताप, पोलीस निरीक्षक अशोक पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
आरती वानखेडे समर्थकांचा मोर्चा
By admin | Published: November 17, 2015 12:31 AM