उधाणामुळे बंधाऱ्यास ११ ठिकाणी भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:39 AM2018-07-22T00:39:59+5:302018-07-22T00:40:09+5:30
धेरंड-शहापूर गावांतील २५० शेतक-यांना फटका; एक हजार हेक्टर भातशेतीत घुसले पाणी; पाच दिवस झाले तरी शासनाचा नाही पत्ता
-जयंत धुळप
अलिबाग : गेल्या आठवड्यात सलग चार दिवस आलेल्या उधाण भरतीमुळे तालुक्यातील खारेपाट विभागातील धेरंड आणि शहापूर या गावांच्या पूर्वेस असलेल्या धरमतर खाडीच्या समुद्र संरक्षक बंधाºयास तब्बल ११ ठिकाणी मोठी भगदाडे पडली आहेत. उधाणाचे पाणी दोन्ही गावांतील एक हजार हेक्टरपेक्षा जास्त भातशेतीत घुसल्याने सुमारे २५० शेतकºयांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती शहापूरचे आपद्ग्रस्त शेतकरी अमरनाथ पाटील यांनी दिली आहे.
भातशेतीत येणारे पाणी थांबविणे, भविष्यात उधाणाचे पाणी शहापूर व धेरंड गावांतील मानवी वस्तीत घुसू नये, यासाठी संरक्षक बंधाºयाची ११ ठिकाणी पडलेली भगदाडे सामूहिक श्रमदानाने बुजवण्याकरिता गेल्या पाच दिवसांपासून ग्रामस्थांचे शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.
हवामान खात्याने १३ ते १७ जुलै दरम्यान उधाणाच्या मोठ्या लाटांचा इशारा दिला होता. त्याआधी दोन वेळा संरक्षक बंधाराफुटीमुळे उधाणाचे पाणी गावातील घरांत पोहोचले होते. या पार्श्वभूमीवर दोन्ही गावांतील ग्रामस्थ दिवस-रात्र पाळत लावून संरक्षक बंधाºयांवर नजर ठेवून होते. १५ जुलैला उधाणाच्या भरतीमुळे बंधाºयास ११ ठिकाणी भगदाडे पडली.
ग्रामस्थांमध्ये संताप
गेल्या पाच दिवसांपासून दररोज किमान १०० ग्रामस्थ बंधाºयाची भगदाडे बुजवण्याकरिता श्रमदान करत आहेत. नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्याकरिता सतर्क असल्याचा दावा करणाºया रायगड जिल्हा प्रशासन वा जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणा यांना जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १५ ते २० कि.मी. अंतरावर आलेल्या या नैसर्गिक आपत्तीची कोणतीही कल्पना नाही. सरकारच्या तलाठ्यापासून कोणीही कर्मचारी वा अधिकारी गावांत फिरकलेला नाही, त्यामुळे नुकसानभरपाईसाठीचे पंचनामे करण्याची कामदेखील गावांत सुरू झाली नसल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे नंदन पाटील यांनी दिली आहे.
‘एमआयडीसी’ची बेफिकिरी
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)ने शहापूर व धेरंडमधील शेतकºयांच्या जमिनी टाटा पॉवर प्रकल्पासाठी संपादित केल्या आहेत. या जमिनी आणि धरमतर खाडी यामधील समुद्र संरक्षक बंधारे यांची दुरुस्ती आणि देखभाल करण्याची जबाबदारी एमआयडीसीची आहे. त्यामुळे खारभूमी विकास विभाग या संरक्षक बंधाºयाची देखभाल व दुरुस्ती करत नाही आणि गेल्या काही वर्षांत एमआयडीसीने आपली जबाबदारी निभावलेली नसल्याने सातत्याने संरक्षक बंधारे फुटून भातशेतीचे नुकसान होत असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी सांगितले.