Abdul Sattar vs NCP: सरड्याप्रमाणे पक्ष, रंग बदलणाऱ्या अब्दुल सत्तारांना राज्यात फिरु देणार नाही!; रायगडच्या उरण NCPचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 09:29 PM2022-11-08T21:29:57+5:302022-11-08T21:36:02+5:30
उरण तालुका प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांचा इशारा
Abdul Sattar vs NCP | मधुकर ठाकूर, उरण: अब्दुल सत्तार यांनी वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दांवर तीव्र शब्दात निषेध करतानाच, सरड्याप्रमाणे पक्ष व रंग बदलणाऱ्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी न केल्यास त्यांना राज्यात फिरुन दिले जाणार नसल्याचा कडक इशारा मंगळवारी उरणच्या राष्ट्रवादीने निषेध रॅली काढून दिला. राष्ट्रवादीच्या संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अपशब्दांचा वापर केल्याने राज्यभरात राष्ट्रवादीकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी उरण तालुका राष्ट्रवादीने उरण शहरातुन निषेध रॅली काढली होती.
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील आणि महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस भावना घाणेकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या निषेध रॅलीत रायगड जिल्हा उपाध्यक्ष ॲड.भार्गव पाटील, राष्ट्रवादीचे उरण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष तालुका वैजनाथ ठाकूर,उरण तालुका अध्यक्ष मनोज भोईर, शहर अध्यक्ष गणेश नलावडे, पुखराज सुतार आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्तेही सहभागी झाले होते. यावेळी रॅलीतून 'नीम का पत्ता...' आणि शिंदे -फडणवीस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मुजोर बोक्यांनी ५० खोके घेऊन महाराष्ट्राचे वाटोळे केले, असा टोला राष्ट्रवादीकडून लगावण्यात आला. शिंदे-फडणवीस सरकार विरोधात जोरदार टीका करतानाच, सरड्याप्रमाणे पक्ष व रंग बदलणाऱ्या मुजोर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी न केल्यास त्यांना राज्यात फिरुन दिले जाणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी आपल्या भाषणातून दिला. तर शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावर आसूड ओढाताना महिलांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस भावना घाणेकर यांनी केली. आता माफीनामा नको, तर राजीनामा द्या अशीही मागणी संतप्त राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली.