समस्यांबाबत ४० गावांचा एल्गार
By admin | Published: December 14, 2015 01:26 AM2015-12-14T01:26:05+5:302015-12-14T01:26:05+5:30
महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील गावांच्या विविध समस्यांबाबत या विभागातील ४० गावांतील ग्रामस्थांनी एक होत आपल्या मागण्यांकरिता आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.
दासगाव : महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील गावांच्या विविध समस्यांबाबत या विभागातील ४० गावांतील ग्रामस्थांनी एक होत आपल्या मागण्यांकरिता आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे. याकरिता नडगाव गावात झालेल्या एका सभेत खाडीपट्टा बहुविकास संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या विभागातील प्रदूषण, रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य, वामणे रेल्वे स्थानक आदी समस्यांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात जवळपास ४० गावांचा समावेश आहे. दादली, वराठी, सव, गोमेंडी, जुई, तुडील, चिंभावे, नरवण, खुटील, रावढळ, आंबीवली आदी गावांचा समावेश आहे. या विभागात असलेल्या समस्यांबाबत या परिसरातील ग्रामस्थ गेली अनेक वर्षे विविध राजकीय संघटनांच्या माध्यमातून संघर्ष करीत आहेत. मात्र आता राजकारण विरहित लढा देण्याकरिता या विभागातील ४० गावातील ग्रामस्थ एकवटले आहेत. या परिसरात महाड औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी ओवळे येथे सोडले जात असल्याने खाडी प्रदूषित होते. या विभागातून रेल्वे जावून देखील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालेला नाही. गावातील जोडणारे रस्ते, पिण्याच्या पाण्याची समस्या आदी समस्यांबाबत रविवारी नडगाव गावात ४० गावातील ग्रामस्थ एक झाले.
नडगाव गावात झालेल्या बैठकीला ४० गावातील जवळपास ३०० ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीत खाडीपट्टा बहुविकास संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी इनामतखान देशमुख यांची तर उपाध्यक्षपदी नामदेव घाणेकर, सचिवपदी वसंत भडवळकर यांची निवड करण्यात आली. येथील ग्रामस्थांनी दाखवलेला विश्वास सार्थकी लावू असे इनायत खान देशमुख यांनी सांगितले.