फरार खंडणीखोराला कामोठेतून अटक
By admin | Published: July 7, 2015 11:36 PM2015-07-07T23:36:40+5:302015-07-07T23:36:40+5:30
पुणे येथे अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला कामोठे येथून अटक करण्यात आली आहे. बिल्डरला खंडणीसाठी धमकावून गोळीबार करून त्याने पळ काढला होता.
नवी मुंबई : पुणे येथे अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला कामोठे येथून अटक करण्यात आली आहे. बिल्डरला खंडणीसाठी धमकावून गोळीबार करून त्याने पळ काढला होता. त्यानंतर कामोठे येथे तो लपल्याची माहिती मिळताच पुणे व कामोठे पोलिसांनी संयुक्त कारवाई करून त्याला अटक केली.
नीलेश भरम (२७) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून तो मूळचा पुण्यातील वाजेघर गावचा राहणारा आहे. त्याच्यावर पुणे शहर पोलीस ठाण्यात १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खंडणीच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. नुकतेच त्याने एका बिल्डरला खंडणीसाठी धमकावत गोळीबारही केला होता. मात्र त्यानंतर तो पुण्यातून फरार झाला होता. अनेक वर्षांपासून विविध गुन्ह्यांप्रकरणी पुणे पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर कामोठे येथे तो राहत असल्याची माहिती पुणे पोलिसांनी कामोठे पोलिसांना दिली होती. त्यानुसार उपआयुक्त विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सकाळी छापा टाकून त्याला अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमवार यांनी सांगितले.
कारवाईत त्याच्याकडून तीन देशी कट्टे व काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. कामोठे सेक्टर ५ येथील देवशिष सोसायटीत चंद्रकांत घाडगे यांच्या घरात नीलेश हा भाड्याने राहत होता. परंतु दोन वर्षांपासून तो त्या ठिकाणी राहत असताना देखील घाडगे यांनी त्याची माहिती पोलिसांना दिलेली नव्हती. (वार्ताहर)