ग्रामीण रुग्णालयात भूलतज्ज्ञाअभावी हाल; सहा महिन्यांपासून कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 11:24 PM2019-12-11T23:24:05+5:302019-12-11T23:24:52+5:30
पोलादपूरमधील स्थिती
- प्रकाश कदम
पोलादपूर : पोलादपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात गेल्या सहा महिन्यांपासून भूलतज्ज्ञ नसल्याने गर्भवतींना प्रसूतीसाठी महाड अथवा माणगाव येथे पाठविण्याचा सल्ला दिला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्याचप्रमाणे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाही महाड येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात करून घेण्याचे सांगण्यात येत असल्याने महिलांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
पोलादपूर शहरापासून एक किलोमीटरवर मुंबई-गोवा महामार्गालगत शासकीय ग्रामीण रुग्णालय आहे. तालुक्यासाठी हे एकमेव ग्रामीण रुग्णालय असून त्यामुळे रुग्णांची संख्याही मोठी असते. या ठिकाणी प्रसूतीसाठी तालुक्यातील दुर्गम, अतिदुर्गम-डोंगराळ भागातून महिला येतात. या वेळी शस्त्रक्रिया करायची असल्यास, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घ्यायची असल्यास महाडमध्ये जाण्याचा सल्ला दिला जातो.
गेल्या सहा महिन्यांपासून या रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या नाहीत. तालुक्यातील पळचिल, महालगुर, ओंबळी कुडपण, मोरगिरी, कामथे, बोरघर, खांड्ज, ढवळे, उमरठ, देवळे, दाभीळ किनेश्वर, आडावळे, बोरावले ही गावे आणि या गावांच्या दहा कि.मी. परिघातील वाड्या-वस्त्यासाठी हे रुग्णालय सोयीचे आहे. मात्र, प्रसूतीसाठी महिला दाखल झाल्यावर तिला पुरेशा सुविधा मिळत नाहीत. रुग्णालयात रुग्णाला जेवण देण्याची सुविधा नाही. परिणामी, रुग्ण तीन-चार दिवस दवाखान्यात असेपर्यंत घरून जेवणाचा डबा आणावा लागतो किंवा आजूबाजूच्या खानावळ किंवा हॉटेलमधून सोय करावी लागते. महिलेला कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी १७ किलोमीटरवर असलेल्या महाड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले जात असल्याने रुग्णासह कुटुंबीयांचेही प्रचंड हाल होतात.
वास्तविक या रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक या पदावर महिला वैद्यकीय अधिकारी असून त्या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. रुग्णालयात शस्त्रक्रिया कक्षही अद्ययावत व सुसज्ज आहे. तरीही येथे शस्त्रक्रिया केल्या जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
मनुष्यबळाअभावी सेवेवर परिणाम
पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज १००ते १५० रुग्ण येतात. तसेच आंतररुग्ण विभागातही रुग्ण दाखल आहेत. मात्र, हे दोन्ही विभागात वैद्यकीय अधीक्षक वगळता एक आयुष डॉक्टर सेवारत आहे.
वास्ताविक रुग्णालयासाठी वैद्यकीय अधिकारी वर्ग-२ ची तीन पदे रिक्त आहेत. त्यापैकी एक आयुर्वेदिक डॉक्टरचे पद रिक्त आहे, यामुळे या रुग्णालयाचा भार वैद्यकीय अधीक्षक आणि आयुष डॉक्टर सांभाळत आहेत. मनुष्यबळाअभावी आरोग्य सेवा कोलमडली आहे.
पूर्वी रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आणि सिझेरिअन शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. मात्र, या ठिकाणी भूलतज्ज्ञ नसल्याने शस्त्रक्रियासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय रायगड-आलिबाग यांनी या रुग्णालयासाठी भूलतज्ज्ञाची नियुक्ती केल्यास शस्त्रक्रिया केल्या जातील.
- डॉ भाग्यरेखा पाटील, वैद्यकीय अधिकारी