जिल्हा नियोजन समिती बैठकीला प्रमुखांचीच गैरहजेरी
By राजेश भोस्तेकर | Published: July 16, 2024 02:22 PM2024-07-16T14:22:25+5:302024-07-16T14:27:09+5:30
खासदार सुनील तटकरेंची नाराजी, गैरहजर अधिकाऱ्यांना नोटीस काढण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश.
राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क |
अलिबाग : रायगड जिल्हा नियोजन समिती बैठकीत विभागीय आयुक्त विभागाचे तसेच निर्णय क्षमता असणारे अधिकारी उपस्थित राहत नसल्याची नाराजी खासदार सुनील तटकरे यांनी बोलून दाखवली आहे. जे अधिकारी बैठकीला गैरहजर राहिले त्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे याना दिले असून अधिकाऱ्यांना मला प्रत्यक्ष भेटण्यास सांगा असेही म्हटले आहे.
जिल्हा नियोजन समितीची शेवटची बैठक जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी १६ जुलै रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सुरू आहे. जिल्हा नियोजन समिती बैठकीला सर्व प्रमुख खात्याचे अधिकारी यांनी उपस्थित राहणे बंधनकारक असते. मात्र अनेकदा खात्याचे प्रमुख हे आपला प्रतिनिधी पाठवून आपली जबाबदारी टाळत असतात. त्यामुळे बैठकीत उपस्थित झालेल्या महत्वाच्या प्रश्नाचे निराकरण होत नाही. याबाबत खासदार सुनील तटकरे यांनी नाराजी व्यक्त करून याचा जाब जिल्हाधिकारी यांना विचारला.
जिल्हा नियोजन बैठक सुरू झाल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी विभागीय कार्यालयाचे प्रमुख अधिकारी कोणकोण उपस्थित आहेत. याबाबत विचारणा केली. यावेळी अधिकतर अधिकारी हे अनुपस्थित असून त्यांनी आपला प्रतिनिधी पाठवल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे प्रमुखांना जिल्हा नियोजन समिती बैठकीचे महत्त्व नाही का ? असा सवाल खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थित केला आहे. यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी याना अनुपस्थित अधिकारी याना करणे दाखवा नोटीस काढण्याचे निर्देश दिले आहेत. तर अधिकारी याना मला प्रत्यक्ष भेटण्यासही सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांना केल्या आहेत.
पैसे वर्ग करण्यासाठी केली जाते पैशाची मागणी - खासदार तटकरे यांचा आरोप
जिल्हा नियोजन बैठकीत एका पुलाच्या कामांबाबत खासदार सुनील तटकरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर जिल्हा नियोजन अधिकारी महेत्रे यांनी पैसे केंद्राकडून आले नसल्याचे उत्तर दिले. मात्र पैसे वर्ग करण्यासाठी पैशाची मागणी केली जाते असा स्पष्ट आरोप तटकरे यांनी केला आहे. याबाबत मेहेत्रे यांनी असे काही होत नाही. याबाबत आपल्याकडे तक्रार असेल तर स्पष्ट करू. असे म्हणाले. तर मग पैसे वर्ग का केले नाही असे तटकरे म्हणून मला जिल्हाधिकारी यांच्या नावाने पत्र द्या देऊन त्यात प्रमा कधी आले, निधी कधी आले याचा उल्लेख करा. अधिवेशनात याबाबत बोलेल असे खासदार तटकरे यांनी म्हटले आहे.