- संजय करडेमुरुड : तालुक्यातील सुपेगाव परिसरात फणसाड अभयारण्याचा विस्तार झालेला असून सुमारे ५४ चौरस किलोमीटर या अभयारण्याचे क्षेत्र व्याप्त आहे. येथे विविध प्रकारचे वन्य जीव आहेत. या अभयारण्यात पाण्याचे २७ नैसर्गिक स्रोत असतानासुद्धा कृत्रिम असे ११ बशी तलाव व १५ वन तलाव तयार करण्यात आले आहेत.
सध्या मुरुड तालुक्याचे तापमान ३८ डिग्री सेल्सिअस असून पक्षी व वन्यजीव, प्राण्यांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी मोठी मेहनत घेण्यात आली आहे. बशी तलाव व वन तलावांमध्ये पाणी उपलब्ध होण्यासाठी चार बोअरिंगसुद्धा मारण्यात आलेल्या असून याद्वारे या तलावांत पाणी टाकले जात आहे. तसेच अन्य ठिकाणांहूनसुद्धा गाडीच्या साह्याने पाणी आणले जाऊन प्राण्यांची तहान भागविण्याचे उत्तम काम फणसाड अभयारण्य विभागाकडून केले जात आहे. उत्तम नियोजन व कर्मचारी वृंदाचे सहकार्य यामुळे येथे मुबलक पाणीपुरवठा आढळून येत आहे.
मुरुड, रोहा व अलिबागच्या सीमारेषेचाही समावेश यामध्ये होत आहे. रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवर हिरव्यागार झाडांच्या कुशीत वसलेले एक घनदाट जंगल अर्थात फणसाड अभयारण्य होय. मुंबईपासून १६० किलोमीटर अंतरावर पनवेल, पेण व अलिबाग मार्गावरील विस्तीर्ण असे फणसाड अभयारण्य म्हणजे निसर्गाचे एक वरदान आहे. विस्तीर्ण अशा या अभयारण्यात साग व निलगिरीची उंच अशी भलीमोठी झाडे असल्याने कडक उन्हातही दाट सावली या भागात आहे. औषधी वनस्पतीसुद्धा या ठिकाणी आढळून येतात.
जगातील सर्वांत लांब असलेल्या वेलींपैकी एक असलेली गारंबीची वेल या ठिकाणी आढळून येते. ९० प्रकारची फुलपाखरे येथे बागडताना दिसतात. फुलपाखरांमध्ये ब्लु मारगोन, मॅप, कॉमन नवाब अशा वैशिष्ट्यपूर्ण जाती आढळून येतात. पक्षांच्या १६४ प्रजाती या ठिकाणी आढळतात. फणसाड अभयारण्यात रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, साळींदर, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, माकड, रानमांजर, बिबट्या आदी वन्यजीव मोठ्या संख्येने आहेत.
पर्यटकांचे व अभ्यासकांचे आकर्षण असलेले शेकरू (मोठी खार)सुद्धा येथे आहे. काशीद, दांडा, सुपेगाव, सर्वे, वडघर परिसरात रानगव्यांचा वावर दिसून आला आहे. पाच रानगवे असल्याची नोंद करण्यात आली आहे. भरपूर खाद्य खाणारा व मोठ्या प्रमाणात पाणी पिणारा हा वन्यजीव असल्याने या अभयारण्यात मुबलक पाणी पिण्याची सोय परिपूर्ण झाल्याने या प्राण्याची प्रजाती वाढणार आहे. शेकरूसारखा दुर्मीळ प्राणीसुद्धा येथे आढळून येत आहे.
या अभयारण्यात असंख्य पक्षी व वन्यजीव असून मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात मुबलक अशी पाण्याची सुविधा करून देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी वन्यजीवांचा वावर आहे अशा ठिकाणी आम्ही बशी तलाव व वन तलाव निर्माण केले आहेत. जेणेकरून वन्यजीव अगदी सहज पाणी पिऊ शकतात. फणसाड अभयारण्यातील माझे सर्व सहकारी पाण्याचे व्यवस्थित नियोजन करीत असून येथील प्राणी व पक्ष्यांना मुबलक पाणीपुरवठा केला जात आहे. प्राण्यांना पाणी मिळावे यासाठी दोन कर्मचारी यासाठी विशेष करून तैनात केले आहेत.बोअरिंगच्या पाण्याबरोबरच गावातूनसुद्धा गाडीच्या साह्याने पाणी आणून बशी तलाव व वन तलावांमध्ये टाकले जाते. प्राणी व पक्ष्यांची योग्य काळजी घेत असल्याची माहिती फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांनी दिली.