नवी मुंबई - गणेश घाटाचा राखणदार अशी ओळख असणाऱ्या कर्जतमधील पदरगडच्या संवर्धनासाठी दुर्गप्रेमी एकवटले आहेत. रविवारी झालेल्या श्रमदान मोहिमेमध्ये विविध संस्थांमधील ५०पेेक्षा जास्त सदस्यांनी सहभाग घेतला होता. दिवसभरात गडावरील टाक्यामधील गाळ काढण्यात आला असून जवळपास ९० टक्के टाके गाळमुक्त करण्यात यश मिळविले आहे.मुंबई, ठाणे, नवी मुंबई मधील ट्रेकर्स व दुर्गप्रेमींसाठी कर्जत परिसर हा पर्वणी ठरत असतो. अनेकांच्या भटकंतीची सुरुवात या परिसरातील गड, किल्ल्यांपासून होत असते. यापूर्वी भटकंतीसाठी येणारे दुर्गप्रेमी आता या गड, किल्ल्यांच्या संवर्धनासाठीही योगदान देऊ लागले आहेत. भावी पिढीपर्यंत हे ऐतिहासिक वैभव पोहोचविण्यासाठी सर्वप्रथम ते जपले पाहिजे या भूमिकेतून संवर्धन मोहिमांचे आयोजन केले जात आहे. सफर सह्याद्री ट्रेकर्स, भटके एडव्हेंचर, सह्याद्री संजीवनी परिवार, दुर्ग पंढरी सामाजिक संस्था व बाप्पा मोरया क्रिकेट संघ राजापूर व इतर संस्थांच्या सदस्यांनी एकत्र येऊन रविवारी तीसरी संवर्धन मोहीम आयोजित केली होती. ५० पेक्षा जास्त सदस्य या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. गडावरील पाण्याच्या टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. हा गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले. जवळपास टाके गाळमुक्त झाले आहे. थोडा गाळ शिल्लक असून तो पुढील मोहिमेच्यावेळी काढला जाणार आहे. सूचना फलक लावलेपदर गडावर जाणाऱ्या मार्गावर नवीन पर्यटक रस्ता चुकू नयेत यासाठी सूचना फलक लावण्यात आले आहेत. यापुढेही संवर्धनाचे काम सुरू ठेवले जाणार आहे. या मोहिमांमध्ये रस्ता व्यवस्थित करणे व इतर कामे केली जाणार आहेत. गड संवर्धनाच्या कामात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दुर्गप्रेमींनी केले आहे.
कर्जतमधील पदरगड संवर्धन मोहिमेला गती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 12:27 AM