वाकण-खोपोली महामार्गाच्या कामाला गती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 11:39 PM2019-10-06T23:39:59+5:302019-10-06T23:40:15+5:30
आधीच्या ठेकेदाराने केलेल्या चुका व कामाच्या अयोग्य पद्धतीमुळे महामार्ग रुंदीकरणाच्या कामाची पुरती वाट लागली होती.
- विनोद भोईर
पाली : वाकंण-पाली-खोपोली राज्य महामार्ग रुंदीकरणाचे काम मागील दीड वर्षापासून संथगतीने सुरू आहे. मात्र, आता पाऊस कमी झाल्याने या मार्गाच्या कामाला मोठी गती मिळाली आहे. येत्या मार्चपर्यंत ८० टक्के काम पूर्ण करण्याचे नियोजन एमएसआरडीसी प्रशासनाने केले आहे. याबरोबरच या मार्गावर पाली, जांभूळपाडा व भाळगुल येथे महत्त्वाच्या नदीपुलांजवळ नव्याने अधिक क्षमतेचे व मोठे पूल बांधण्यात येणार आहेत. त्याची प्राथमिक कामाची सुरुवात आता झाली आहे.
आधीच्या ठेकेदाराने केलेल्या चुका व कामाच्या अयोग्य पद्धतीमुळे महामार्ग रुंदीकरणाच्या कामाची पुरती वाट लागली होती. त्यामुळे एमएसआरडीसी प्रशासनाने ठेकेदाराची खांदापालट करत दुसऱ्याकडे काम सोपविले आहे. पावसाळ्यात या मार्गावर मोठमोठे खड्डे, दगड गोटे, चिखल व राडारोडा होता. खड्डे आणि रस्त्याची दुरवस्था यामुळे अनेक अपघातांना आमंत्रणही मिळाले होते.
आता या मार्गाच्या कामाला वेग आला आहे. त्याचा जो भाग पावसाळ्यात खूप खराब झाला होता त्याचे पॅचवर्क चे काम सुरू झाले आहे. जे काम सुरू झाले नव्हते ते करण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे उपअभियंता सचिन निफाडे यांनी दिली. मार्चपर्यंत ८० टक्के काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. वनविभाग आणि ग्रामस्थांच्या समस्याही काही प्रमाणात सोडविल्या जात आहेत.
रुंद पुलामुळे गैरसोय थांबणार
पाली व जांभूळपाडा येथील अंबा नदीवरील पुलाची उंची कमी आहे, त्यामुळे पावसामुळे नदीचे पाणी वाहून दरवर्षी या पुलावरून पाणी जाते. परिणामी, वारंवार येथील वाहतूक ठप्प होते. आता महामार्गाच्या रुंदीकरणाबरोबरच जवळपास ६० ते ७५ टन क्षमता असलेले १६ मीटर रुंद व चार मार्गाचा (लेन) असलेले पूल बनवणार आहेत. त्याचे प्रारंभिक काम सुरू झाले आहे, अशी माहिती एमएसआरडीसी प्रशासनाने दिली.
महत्त्वाचा मार्ग
वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हा मार्ग मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय मानला जातो. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-गोवा महामार्गाला जोडतो. त्याचबरोबर येथून विळे मार्गे पुणे आणि माणगावलाही जाता येते. त्यामुळे मुंबई-पुणे तसेच कोकणासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे, त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील ताण कमी होईल.
या राज्य महामार्गाचे काम लवकर व चांगल्या दर्जाचे करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. मार्चपर्यंत ८० टक्के काम पूर्णत्वास नेण्याचे नियोजन केले आहे. काही समस्या आहेत त्यावर उपाय काढण्याचा प्रयत्न करत आहोत.
- सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी.
मार्गावर कामाला सुरुवात झाली आहे. कामाचा वेग पाहता लवकरच या मार्गाचे काम पूर्ण होईल. असे झाल्यास प्रवासी व वाहनचालकांची सोय होईल. वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग अधिक सुरक्षित होईल.
- योगेश मोरे, प्रवासी, परळी.