पोलादपूर - पोलादपूर-महाबळेश्वर राज्यमार्गावर चिरेखिंड गाव हद्दीत सातारा येथून महाडच्या दिशेने जाणारा साखरेचा ट्रक सुमारे २०० फूट दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.चालक अमर मारुती पिसाळ (२८ रा. चारोळी, ता. खटाव, जि. सातारा) हा ट्रक क्रमांक एम एच ५०/२५२६ यामध्ये साखर भरून घेऊन आंबेनळी घाटातून जात असता चिरेखिंड गाव हद्दीत वाहनावरील ताबा सुटून ट्रक सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळला. यात चालक अमर पिसाळ किरकोळ जखमी झाला आहे. मात्र, सुदैवाने क्लिनर सचिन दिलीप भिसे हा बचावला. त्याला कोणतीही दुखापत न झाल्याचे पोलिसांनी माहिती देताना सांगितले.या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून पाऊस सुरू असल्याने साखरेची पोती भिजली आहेत. या अपघाताची माहिती समजताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली, या वेळी महामार्ग पोलीस हवालदार राजू पवार उपस्थित होते. पोलिसांनी जखमी चालकास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
आंबेनळी घाटातील २०० फूट दरीत कोसळला साखरेचा ट्रक, चालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 1:50 AM