कशेडी घाटात कंटेनरला अपघात
By admin | Published: October 31, 2015 12:08 AM2015-10-31T00:08:57+5:302015-10-31T00:08:57+5:30
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री १२.३० वाजता पार्टेवाडी हद्दीत घडली.
पोलादपूर : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री १२.३० वाजता पार्टेवाडी हद्दीत घडली. कंटेनर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. कशेडी टॅप पोलिसांनी काही वेळानंतर वाहतूक सुरळीत केली.
कंटेनरचालक सुखराम प्रसूती गौतम (४२, रा. मुस्तराबाद) हा आपल्या ताब्यातील कंटेनर घेऊन लोटे ते गुजरात जात असता कशेडी घाटात पार्टेवाडी हद्दीत एका अवघड वळणावर कंटेनरने झोला मारल्याने पलटी झाला. यामुळे वाहतूक काही काळ खोळंबली. या घटनेची माहिती समजताच कशेडी टॅपचे पोलीस उपनिरीक्षक अनिल घाडीगावकर एएसआय माने, राठोड, यादव, कांबळे, हसबे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जगद्गुरू स्वामी नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेला पाचरण करून जखमी चालक गौतम यास पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात
उपचारासाठी दाखल केले.
कंटेनर पलटी झाल्याने कशेडी पोलिसांनी अन्य मार्गाने वाहतूक वळवण्यात आली. महाड येथून क्रेन मागवून हा महाकाय कंटेनर महामार्गावरून रात्री उशिरा हटविण्यात यश आले. (वार्ताहर)