महामार्गावर एसटीला अपघात, प्रवासी बचावले, एक मुलगी किरकोळ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 03:07 AM2018-07-02T03:07:17+5:302018-07-02T03:08:31+5:30
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी ३च्या सुमारास केंबुर्ली गाव हद्दीत ट्रेलरच्या हुलकावणीमुळे अर्नाळा-गुहागर ही एसटी रस्त्याच्या कडेला एका डिव्हाइडरवर आदळली. या अपघातामध्ये एसटीमधील एक लहान मुलगी किरकोळ जखमी झाली.
दासगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी ३च्या सुमारास केंबुर्ली गाव हद्दीत ट्रेलरच्या हुलकावणीमुळे अर्नाळा-गुहागर ही एसटी रस्त्याच्या कडेला एका डिव्हाइडरवर आदळली. या अपघातामध्ये एसटीमधील एक लहान मुलगी किरकोळ जखमी झाली.
अर्नाळा-गुहागर मुंबई, ठाण्यामधून सकाळी १०.१५ वाजता सुटणारी एसटी (एमएच २० बीएल १८५४) ही महाड तालुका हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर केंबुर्ली गाव हद्दीत दुपारी ३च्या सुमारास आली. याच वेळी महाड ते मुंबई दिशेला जाणारा कंटेनर (एमएच ४६ /२७२५) याने एसटीला हुलकावणी दिली. यामुळे एसटी दुभाजकावर आपटून चिखलामध्ये फसली.
एसटीमध्ये महाड, चिपळूण, गुहागर येथे जाणारे ३८ प्रवासी प्रवास करत होते. अपघातामध्ये एक लहान मुलगी किरकोळ जखमी झाल्याची माहिती एसटी वाहक पी. एम. मगर यांनी दिली. अपघातानंतर कंटेनर चालक वाहन घेऊन त्या ठिकाणहून पसार झाला. एसटीचालक कळंबे यांनी दुसऱ्या वाहकाच्या साह्याने कंटेनरचा पाठलाग करत काही अंतरावर त्याला थांबवून महाड शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.
अरुंद रस्त्यामुळे अपघात
अपघाताच्या ठिकाणी चौपदरीकरणाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात डोंगर भागाचे खोदकाम झाले आहे. या पावसामुळे दोन वेळा महामार्गावर मातीचे ढिगारे आले. ठेकेदार कंपनीने या ठिकाणी आलेल्या मातीच्या ठिकाणी डिव्हायडर लावल्याने या ठिकाणी महामार्ग अरुंद झाला आहे. यामुळे अपघातांना निमंत्रण दिल्यासारखे हे ठिकाण झाले आहे.