केमिकल वाहून नेणाऱ्या कंटेनरला जेएनपीए-पळस्पे दरम्यान अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2022 05:36 PM2022-11-26T17:36:11+5:302022-11-26T17:38:12+5:30
कंटेनर फुटून केमिकल रस्त्यावर सांडले, पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा
मधुकर ठाकूर, उरण: जेएनपीए-पळस्पे दरम्यानच्या राष्ट्रीय ४-बी महामार्गावरील चिर्ले गावानजीक झालेल्या अपघातात कंटेनर फुटून केमिकल रस्त्यावर सांडल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. यामुळे या मार्गावर पाच किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
जेएनपीए बंदरातून जेएनपीए-पळस्पे दरम्यानच्या राष्ट्रीय ४-बी महामार्गावरून आयात-निर्यात कंटेनर मालाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. शनिवारी (२६) सकाळी ७ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय ४-बी महामार्गावरील चिर्ले गावानजीक केमिकल वाहतूक करणाऱ्या एक कंटेनर ट्रेलरचा अपघात झाला.या अपघातग्रस्त कंटेनर फुटल्याने त्या ड्रममध्ये असलेले केमिकल मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर सांडले.
केमिकल रस्त्यावर पसरल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून या मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आली होती.अग्निशमन दल, पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली होती. दरम्यान सकाळच्या सुमारास पाच किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.त्यानंतर उशिराने या मार्गावरील वाहतूक पुर्ववत सुरू करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
रस्त्यावर सांडलेले हायड्रोपॅरासाईट नावाचे केमिकल
फारसं ज्वलनशील नसले तरी त्याठिकाणी धूर येण्यास सुरुवात झाली होती.तसेच केमिकलचा उग्र दर्प हवेत पसरण्यास सुरुवात झाल्याने डोळे चुरचुरण्यास सुरुवात झाली होती.त्यामुळे खबरदारी घेत नागरिकांना घटना स्थळापासुन दूर ठेवण्यात आले होते.कस्टमच्या परवानगी नंतर पोलिस, अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने अपघातग्रस्त केमिकलने भरलेला कंटेनर निर्मनुष्य ठिकाणी नेऊन खाली करण्यात आल्याची माहिती उरण वाहतूक नियंत्रण विभागाचे पीएसआय संजय पवार यांनी दिली.