मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; २४ प्रवासी जखमी, डंपरच्या धडकेत एसटीचा चक्काचूर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 06:31 AM2023-05-10T06:31:07+5:302023-05-10T06:31:27+5:30
नियंत्रण सुटल्याने घडली घटना
महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड शहरानजीक नाते खिंडीजवळ डंपर व एसटीची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, यात एसटीच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला.
अपघातात एसटीचालक, डंपरचालक आणि अन्य २२ प्रवासी असे एकूण २४ प्रवासी जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी ९:४५ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. दरम्यान, इतकी भीषण धडक होऊनही दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. त्यामुळे काळ आला होता, पण वेळ नाही अशीच स्थिती महामार्गावर होती.
मुंबई एसटी डेपोमधून सकाळी ४:४५ वाजता सुटणारी मुंबई-महाबळेश्वर बस महाड शहरानजीक नाते खिंड या ठिकाणी सकाळी ९:४५ वाजता आली. याच सुमारास मुंबई दिशेला जाणारा एक भरधाव डंपर बसवर येऊन आदळला. एसटीत एकूण ४० प्रवासी होते. सर्व जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात आणि एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, मुंबई- गोवा महामार्गावरची अपघातांची मालिका थांबता थांबत नसल्याचेच चित्र आहे.
अपघातात जखमी झालेल्या त्या २४ प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे
या अपघातामध्ये एसटीचालक सिद्धार्थ राजेंद्र जंगम (३१, रा. बांधन अलिबाग), उमेश दत्तात्रय शिंगटे (३५, रा. सळवल, सातारा), अजित बाळ पाटील (५१, रा. पेण), विमल महेश शिगवण (४० रा. तळेगाव माणगाव), कलंदर जरुद्दीन कुवारे (३८ रा. नागोठणे), शांती दगडू भोसले (७०, रा. देवळी माणगाव), उमेश बळीराम खैर (४२, रा. कोलाड), सुनील सुदाम रसाळ (५१, रा. सापे महाड), नमिता गोविंद वाघमारे (६० रा. तळेगाव माणगाव), कविता नरेश मानंद (३८ रा. देवळी माणगाव), सविता आदेश भोसले (३१, रा. देवळी माणगाव), लतिका लक्ष्मण शिंदे (४५, रा.छत्री निजामपूर महाड), अलमास असीम कुवारे (३६, रा. नागोठणे), अफोज अजीज कुवारे (३६, रा. नागोठणे), अब्दुल रहेमान आसिफ कुवारे (७, रा. नागोठणे), सविता सखाराम शिर्के (५०, रा. चिंचवली माणगाव), महमद शहा अब्दुल अजीज कुवारे (१०, रा. नागोठणे), मरियम अब्दुल अजीज कुवारे (१२, रा. नागोठणे), फातिमा आसिफ कुवारे (३, रा. नागोठणे), भारती लक्ष्मण हिरवे (१७, रा. रानसई, पेण), दीपाली लक्ष्मण हिरवे (२०, रा. रानसई), शर्वरी अनंत कासार (२०, रा. गोरेगाव, मुंबई), आप्पा पोपट चव्हाण (३४, रा. बरड, सातारा) असे २४ प्रवासी जखमी झाले.
अपघाताचे वृत्त कळताच महामार्ग वाहतूक शाखा पोलिस महाड आणि महाड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदतकार्य सुरू केले. क्रेनच्या साह्याने दोन्ही वाहने बाजूला करून महामार्गाची वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद महाड शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.