मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; १३ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 03:49 AM2020-01-04T03:49:50+5:302020-01-04T03:49:58+5:30
टेम्पो ट्रॅव्हलर-मालवाहू टेम्पोची धडक
दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर महाड तालुक्यातील वहूर गावासमोर टेम्पो ट्रॅव्हलर आणि मालवाहू टेम्पोची समोरासमोर धडक झाली. शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजता झालेल्या या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक आणि प्रवासी असे एकूण १३ जण जखमी झाले. टेम्पो ट्रॅव्हलर क्रमांक एम.एच.१२ क्यू जी ४१७० हा पुणे ते दापोली तर मिनी टेम्पो क्रमांक एम.एच.ए.पी. ९०२२ देवरुख ते पेण असा प्रवास करत होते. टेम्पो ट्रॅव्हलर वहूर गावाजवळ येताच, ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या मालवाहू टेम्पोला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातानंतर स्थानिकांनी मदतीला धाव घेत टेम्पो ट्रॅव्हलरमधील प्रवाशांना बाहेर काढून महाडमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. तर, टेम्पोचालक हा गंभीर जखमी झाल्याने त्याला मुंबईतील रूग्णालयात नेण्यात आले आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने अपघातानंतर टेम्पो ट्रॅव्हलर हा रस्त्याच्या मध्यभागी अडकून पडला. यामुळे जोपर्यंत टेम्पो ट्रॅव्हलर बाजूला करता आला नाही, तोपर्यंत जवळपास तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्ग वाहतूक पोलीस आणि महाड शहर पोलीस यांना ही वाहतूक सुरळीत करण्यात जवळपास एक तास गेला. वहूर ग्रामस्थ नदीम इसाने, समीर इसाने, हबीब कादरी यांनी जेसीबीच्या साहाय्याने चालकाला अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर बाहेर काढले. दोन्ही वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत केली.