खोपोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्र मासाठी शाहू महाराज सभागृहात गाडीतून उतरून जात असतानाच पाठीमागून रिक्षाने जोरदार धडक दिल्याने, शिळफाटा येथील हॉटेलमालक व खोपोलीच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे नरेंद्र तथा बंधू साखरे (६८) यांचे रविवारी सकाळी ११.३०च्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.बंधू साखरे हे शरद पवार यांचे विश्वासू सहकारी. युवक काँग्रेस, एस. काँग्रेसमध्ये असतानाही त्यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते संस्थापक सदस्य होते. खोपोली नगरपरिषदेमध्ये नगरसेवक म्हणून काम करीत असताना शिळफाटा परिसरातील विकासाला गती देण्याचे काम त्यांनी केले.वैश्य वाणी समाजाचे ते माजी अध्यक्ष व आधारस्तंभ होते. धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताकई येथील विठ्ठल मंदिर देवस्थान समितीचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना न्याय मिळण्यासाठी ते कायम झटत होते. पेण बँकेच्या प्रशासक मंडळावर ठेवीदारांचे प्रतिनिधी म्हणून ते काम करीत होते.>खोपोलीतील बहुआयामी व्यक्तिमत्त्व - मसुरकरबंधू साखरे यांच्या हॉटेलचा वडा खाण्यासाठी, त्यांच्याकडे जेवण्यासाठी भारतरत्न पं. भीमसेन जोशी, लता मंगेशकर, शरद पवार यांच्यासारखी दिग्गज मंडळी येत असत. शरद पवार कधीही भेटले की बंधूंची नावाने चौकशी करीत असतात. खोपोलीच्या विकासासाठी कायम झटणारे, पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून सर्वांशी आपुलकीने व्यवहार करणारे आणि पक्षासाठीच आपला शेवटचा श्वासही देणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर यांनी बंधू साखरे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
हॉटेल व्यावसायिकाचे अपघाती निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 2:08 AM