महाडमध्ये भंगारात टाकलेल्या सिलिंडरमुळे अपघाताचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 12:07 AM2019-05-30T00:07:28+5:302019-05-30T00:07:37+5:30
महाड एमआयडसीतील औद्योगिक वापरातील भंगार अवस्थेतील सिलिंडर आसनपोई गावाजवळ उघड्यावर टाकण्यात आला आहे.
दासगाव : महाड एमआयडसीतील औद्योगिक वापरातील भंगार अवस्थेतील सिलिंडर आसनपोई गावाजवळ उघड्यावर टाकण्यात आला आहे. हा सिलिंडर भंगार अवस्थेतील असला तरी तो भरलेला असल्याने वाढत्या तापमानाने दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत संबंधित प्रशासनाला कळवूनही योग्य दखल घेतली न गेल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थ हनुमंत पवार यांनी केली आहे.
महाड औद्योगिक वसाहतीतील कंपन्या, भंगार व्यावसायिकांकडून सुरक्षेबाबत उपाययोजनांकडे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याने याठिकाणी वारंवार अपघात होत असतात. आसनपोई गावाजवळ लक्ष्मी आॅरगॅनिक कंपनीच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत अज्ञाताने औद्योगिक वापरातील वायूचा सिलिंडर उघड्यावर टाकला आहे. गेले पंधरा दिवस हा सिलिंडर या ठिकाणी पडला असून त्यातून होणाऱ्या वायुगळतीमुळे परिसरात उग्र दर्प येत आहे.
सिलिंडर क्लोरीन वायूचा असण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवण्यात येत आहे.
महाड औद्योगिक क्षेत्रात असे सिलिंडर वापर करणारे जवळपास ८० टक्के कारखाने आहेत. अज्ञात भंगार व्यावसायिकाने तो याठिकाणी टाकला असण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. ज्याठिकाणी सिलिंडर टाकण्यात आला आहे, ती जागा गावापासून दूर असली तरी त्यामुळे एमआयडीसी परिसरात येणारे कामगार, नदीवर पाणी पिण्यासाठी येणाºया गुरांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो.
महाड प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाड एम.एम.ए.चे स्थानिक आपत्कालीन पथक यांना याबाबत कळवण्यात आले, तरी अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. गेले पंधरा दिवस हा सिलिंडर याच ठिकाणी पडून आहे. यातून वायुगळती अगर याचा स्फोट झाल्यास आसनपोई ग्रामस्थांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो.
>आसनपोई परिसरात बेवारस सिलिंंडर टाकण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कर्मचारी तुटवडा असल्याने विलंब झाला असला तरी संबंधित सिलिंडरची पाहणी करून पुढील कार्यवाही केली जाईल.
- प्रकाश ताटे, क्षेत्र अधिकारी, उपप्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, महाड
>महाड औद्योगिक वसाहतीतील नागरिकांच्या जीवाशी खेळणाºया कंपन्या आणि भंगार व्यावसायिकांवर वचक नसल्याने हे प्रकार घडत आहेत. सिलिंडरची पाहणी करून तो टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
- तुकाराम देशमुख, अध्यक्ष, किसान क्रांती