- विनोद भोईरपाली : वडखळ (ता. पेण) जवळील धरमतर जेट्टीवरून ट्रक-डम्परमधून ओव्हरलोड भरलेला दगडी कोळसा नागोठणे रेल्वे स्थानकात आणण्यात येत आहे. यासाठी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून महामार्गावर दिवस-रात्र ट्रक-डम्परची वाहतूक सुरू आहे. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, या गंभीर प्रकाराकडे पेण येथील प्रादेशिक परिवहन व वाहतूक अधिकारी तसेच वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.कर्नाटक राज्यातील बेल्लारी, (पो. विजयनगर) येथे असलेल्या जे. एस. डब्ल्यू स्टील लि.च्या कारखान्यातील उत्पादन प्रक्रि येत लागणारा कच्चा माल म्हणून या खनिज कोळशाचा वापर करण्यात येतो. हा कोळसा जहाजातून धरमतर जेट्टीवर आणण्यात येतो. तेथे हा कोळसा उतरविण्यात आल्यानंतर तो ट्रक-डम्परने आणून नागोठणे रेल्वेस्थानकात उतरविण्यात येतो. त्यानंतर हा कोळसा मालगाडीने वेल्लारी येथे नेण्यात येत आहे. नागोठणे रेल्वे स्थानकात मोठमोठ्या डम्परद्वारे होणाऱ्या या कोळसा वाहतुकीत जेवढा जास्त कोळसा डम्परमधून आणला जाईल, तेवढे जास्त भाडे मिळत आहे. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त कोळसा डम्परमध्ये भरला जात आहे. जेथे एका डम्परची १० ते १२ टन कोळसा वाहतुकीची क्षमता आहे. त्या डम्परची उंची डम्परच्या तीनही बाजूला लाकडी फळ्या लावून वाढविण्यात आली आहे, त्यामुळे अशा डम्परमधून सध्या १८ ते २० टन कोळसा आणण्यात येत आहे.हा कोळसा डम्परमध्ये तुडुंब भरला जात असल्याने व त्यावर नावापुरते ताडपत्री टाकण्यात येत असल्याने वेगाने येणाºया या डम्परमधील कोळसा महामार्गावर मोठ्या प्रमाणात पडत आहे. हा कोळसा वेगाने रस्त्यावर उडत असल्याने रस्त्यावरून जाणारे दुचाकीस्वार, पादचारी यांना या कोळशामुळे धोका निर्माण झाला आहे.डम्परमधून उडालेला हा दगडी कोळसा जर एखाद्या पादचारी वा दुचाकीस्वारास लागला तर त्याच्या जीवावर बेतू शकते, असे असूनही पेण येथील प्रादेशिक परिवहन व महामार्ग वाहतूक शाखेच्या अधिकारी या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवासी, वाहनचालकांकडून होत आहे. त्यामुळे या ओव्हरलोड कोळसावाहू डम्परवर दोन्ही खात्याच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.ओव्हरलोड कोळसा वाहतुकीसंदर्भात सर्व डम्परमालकांना बोलवून कोळसा रस्त्यावर पडणार नाही व योग्य त्या प्रमाणात कोळसा भरण्याच्या सूचना आधीच केल्या आहेत. जर अजूनही या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात येत असेल तर संबंधित डम्परवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.- ऊर्मिला पवार, प्रादेशिक परिवहन अधिकार, पेण-रायगड
मुंबई-गोवा महामार्गावर ओव्हरलोड कोळसा वाहतुकीमुळे अपघाताचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 2:04 AM