रोह्यात नायब तहसीलदारांच्या निलंबनानंतर फक्त खाते चौकशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 01:50 AM2019-09-06T01:50:43+5:302019-09-06T01:50:48+5:30

दिव सरकारी पड जमीन विक्री प्रकरण : अद्याप पोलिसांत एफआयआर नाही; तालुक्यात चर्चा

 Account inquiry only after suspension of Naib tahsildar in Roh! | रोह्यात नायब तहसीलदारांच्या निलंबनानंतर फक्त खाते चौकशी!

रोह्यात नायब तहसीलदारांच्या निलंबनानंतर फक्त खाते चौकशी!

Next

मिलिंद अष्टीवकर 

रोहा : रोहा तालुक्यातील दिव गावातील शासकीय जमीन घोटाळ्या प्रकरणी नायब तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई झाली असून फक्त खाते चौकशी सुरू असल्याचे समजते आहे. ३५० एकर इतक्या मोठ्या स्वरूपाचा गैरव्यवहार उघड होऊन अनेक दिवस झाले तरी अद्याप पोलिसांत साधी एफआयआर दाखल करण्यात आलेली नसल्याचे तालुक्यात याबाबत उलट-सुलट चर्चांना उधाण आले. सामाजिक कार्यकर्ते उस्मान रोहेकर यांनी पत्रक प्रसिद्धीस देऊन या कारवाई विषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तर या प्रकरणातील इतर अधिकारी, दलाल आणि खरेदीदार यांच्यावर कधी कारवाई होणार याकडे रोहेकरांचे लक्ष लागले आहे.

रोहा तालुक्यातील दिव गावातील ३५० एकर शासकीय पड जमीन संगनमताने विक्री प्रकरणाविरोधात शिवसेनेचे विभागप्रमुख उद्देश वाडकर व सर्वहारा जन आंदोलनाने तक्रार करीत आवाज उठविला होता. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर या प्रकरणी रोहा नायब तहसीलदार सिराज तुळवे यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, प्रकरणातील महत्त्वाचे सूत्रधार असलेले अधिकारी, दलाल, खरेदीदार आदी लोक अद्याप मोकाट असून त्यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई झालेली नाही. रोहा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते उस्मान रोहेकर यांनी या प्रकरणी एक पत्र प्रसिद्धीस दिले असून त्यामध्ये या गैरव्यवहाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामध्ये एकटा नायब तहसीलदार ३५० एकर सरकारी जमिनीचा गैरव्यवहार करू शकतो का?, अनेकांचे हात अडकले असल्याने चौकशी धिम्या गतीने सुरू आहे. जमिनी अधिग्रहण अधिसूचना निघाली त्यापासूनच हा सर्व व्यवहार संशयास्पद आहे. प्रकल्प दिव भागात नियोजित असताना आणि लगत गावांत मुबलक जमीन उपलब्ध असताना, दिवपासून दूरवर ५० कि.मी. अंतरावर सुतारवाडी लगतची दोन गावे या प्रकल्पांतर्गत निर्देशित केली गेली.
सुतारवाडी कोणाचे गाव, लगतच्या गावांत कोणी बेनामी जमिनी घेतल्या आहेत याची चौकशी झाली पाहिजे. त्याबरोबर जमीन अधिसूचना प्रसिद्ध होण्याच्या ६-८ महिने अगोदर दिव विभागात इतके जमीन व्यवहार कसे झाले? दिव भागात कोणाचे एजंट-दलाल जमिनी खरेदीसाठी फिरत होते? माणगाव आणि चणेरा विभागातील दलालांना कोणी दिव परिसरात जमीन खरेदीसाठी पाठविले? हा प्रश्न रोहा तालुक्यात विचारून पाहा, उत्तर कोणीही सामान्य माणूस देईल, असे रोहेकर यांनी म्हटले आहे.
अडचणीत सापडलेल्या या दलालांकडून आता भाजपच्या वरिष्ठ नेत्याचे नाव घेतले जात आहे. या व्यवहारात पडद्यामागील सूत्रधार कोण आहे ते सत्य बाहेर यावे, म्हणूनच कारवाई धिम्या गतीने सुरू
आहे. याबाबत खरेदीदार आणि साक्षीदार यांच्यावर पोलीस कारवाई झाल्यास सत्य बाहेर येईल. ते येऊ नये म्हणून केवळ खाते चौकशीचे सोपस्कार सुरू असल्याचे रोहेकर यांनी सांगितले आहे. या प्रकरणी रोहा पोलिसांत चौकशी केली असता कुठलीही एफ.आय.आर. अद्याप दाखल झाली नसल्याचे
पी. एस. म्हात्रे यांनी सांगितले.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिव सरकारी जमीन घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने या प्रकरणी एफ.आय.आर. दाखल करावे. तसेच हे प्रकरण ए.सी.बी.कडे चौकशीसाठी द्यावे, अशी आमची मागणी आहे. त्यातून शासकीय, राजकीय, दलाल, साक्षीदार, खरेदीदार आदी अनेक नावे समोर येणार आहेत.
- नितीन परब, अध्यक्ष,
रोहा तालुका सिटिझन्स फोरम.
रोहे तालुक्यातील दिव येथील सरकारी पड जमीन विक्री प्रकरणी नायब तहसीलदारांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू आहे. चौकशीमधून काय बाहेर येते, त्यानंतरच पुढील करावाई करण्यात येईल.
- पद्मश्री बैनाडे, निवासी उपजिल्हाधिकारी, रायगड
 

Web Title:  Account inquiry only after suspension of Naib tahsildar in Roh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.