अलिबाग : पत्नी आणि दीड वर्षाची मुलगी अशा दोघींचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी आरोपीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पेण तालुक्यातील वाशी येथील उमेश पाटील याने पत्नी शालीनी आणि दीद वर्षांच्या मुलीचा खून करून, पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांच्यावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचे निर्दयी कृत्य केले. त्याप्रकरणी जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. आर. पेठकर यांनी शनिवारी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. महिला मुक्तीदिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा न्यायालयाने दिलेला हा दुहेरी जन्मठेपेचा निकाल जिल्ह्यातील पहिलाच निकाल आहे.पेण तालुक्यातील वाशी या गावातील प्रदीप म्हात्रे यांची मुलगी चैताली हिचा प्रेमविवाह त्याच गावातील उमेश पाटील याच्याबरोबर झाला होता. त्यांना आर्या नावाची मुलगी झाली. चैतालीचा पती उमेश ृकाहीही कामधंदा करीत नसे. तो पत्नी चैतालीस मारहाण करीत असे. गावच्या तंटामुक्त गाव समितीने या प्रकरणात हस्तक्षेप करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तंटामुक्त गाव समितीच्या सदस्यांसमोरही उमेशने चैतालीस मारहाण करून तिला व मुलगी आर्या या दोघींनाही ठार मारण्याची धमकी दिली होती. पती उमेशबरोबरच चैतालीचे सासूसासरेदेखील चैतालीस त्रास देत असत. उमेशच्या अन्य एका मुलीबरोबरच्या पे्रमप्रकरणावरूनही त्यांच्यात वाद झाला होता.दीड वर्षाची मुलगी आर्या हिला आपल्या आईवडिलांच्या घरी ठेवून चैताली कामावर जात असे. २८ फेब्रुवारी २०१३ ला संध्याकाळी चैताली पेण येथून कामावरून मुलीस घेऊन वाशी येथील जगदंबा वाडी येथे सासरच्या घरी आली. त्या दिवशी रात्री उमेशशी भांडण झाले. त्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चैताली हिला शोधण्याकरिता व चौकशी करण्याकरिता तिची सासू शालिनी पाटील व सासरे गणेश पाटील हे चैतालीचे वडील प्रदीप म्हात्रे यांच्या घरी आले. त्यांच्यासोबत चैतालीचे वडील प्रदीप म्हात्रे हे चैतालीस शोधायला निघाले. जगदंबा वाडीजवळील एका मोकळ््या जागेत चैताली व तिची मुलगी आर्या यांचे मृतदेह पूर्ण जळालेले दिसले.न्यायालयाने उमेश पाटील यास पत्नी व मुलीच्या खुनाप्रकरणी दोषी ठरवून प्रत्येक खुनासाठी जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड अशी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा, पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड आणि पत्नीचा छळ केल्याप्रकरणी एक वर्ष सक्तमजुरी व ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. मृत चैतालीचे सासरे गणेश पाटील व सासू शालिनी पाटील यांना पुरेशा पुराव्याअभावी दोषमुक्त करण्यात आले. मात्र त्यांच्या सुटकेबाबत सरकार पक्षातर्फे मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शासकीय अभियोक्ता अॅड. प्रसाद पाटील यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)
खूनप्रकरणी आरोपीस दुहेरी जन्मठेप
By admin | Published: January 03, 2016 3:49 AM