आंबेत गावाला समस्यांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 02:48 AM2018-04-11T02:48:49+5:302018-04-11T02:48:49+5:30

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय आरोग्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांची कारकीर्द राज्याबरोबरच देशालाही परिचित आहे.

Acne eclipse problems in the village | आंबेत गावाला समस्यांचे ग्रहण

आंबेत गावाला समस्यांचे ग्रहण

Next

अरुण जंगम 
म्हसळा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय आरोग्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांची कारकीर्द राज्याबरोबरच देशालाही परिचित आहे. राज्यातील संजय गांधी निराधार योजना असो वा देशात राबविण्यात येणारी पल्स पोलिओ मोहीम, यातून त्यांनी सातत्याने जनसामान्यांशी नाळ जोडली आहे. आंबेत हे बॅ.ए.आर.अंतुले यांचे जन्म गाव. मात्र, त्यांच्या निधनानंतर हे गाव अक्षरश: पोरके झाले आहे. लोकप्रतिनिधींबरोबरच स्थानिक प्रशासनालाही त्याचा विसर पडल्याने आंबेत गावाची सध्या दयनीय अवस्था झाली आहे.
आंबेत हे गाव म्हसळा या तालुक्याच्या ठिकाणापासून तब्बल ३० किमी अंतरावर आहे. सुमारे ३० वर्षांपूर्वी बॅ.ए.आर.अंतुले यांनी १९७८ मध्ये गावात ‘कुटुंब कल्याण केंद्राची’ स्थापना केली. आरोग्य अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेविका, शिपाई असे पूर्णवेळ अधिकारी व कर्मचारी येथे कार्यरत राहून सेवा देत होते.
कुटुंब कल्याण केंद्रातील ही सर्व पदे केंद्र शासनाच्या एका विशेष योजनेतून देण्यात आली होती. मात्र, ही विशेष योजना बंद झाली आणि २००५ मध्ये ही सर्व पदे राज्याच्या आरोग्यसेवेत इतरत्र समाविष्ट करण्यात आली आणि हे कुटुंब कल्याण केंद्र बंद पडले.
नागरिकांच्या सेवेसाठी २००५ मध्ये आंबेत आरोग्य उपकेंद्राची स्थापना करण्यात आली. त्यात २००८ मध्ये प्रसूतीगृह उभारण्यात आले. मात्र, गेल्या सहा ते सात महिन्यांपासून आरोग्य उपकेंद्र जिल्हा परिषदेकडून दुर्लक्षित राहिल्याने उपकेंद्रास असुविधांचे ग्रहण लागले आणि ते बंद पडले. आरोग्य उप केंद्रात नियुक्त असलेले डॉक्टर आणि कर्मचारी गेल्या काही महिन्यांपासून कामावर येत नसल्याची तक्रार येथील ग्रामस्थांंनी केली असता आरोग्य प्रशासन याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
आंबेत आरोग्य उपकेंद्र हे खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येते. हे उपकेंद्र बंद असल्याने रुग्णांना आंबेतपासून ३० किमी अंतरावर असलेल्या माणगाव किंवा महाड येथे जावे लागत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
आंबेत कुटुंब कल्याण केंद्राच्या इमारतीची अवस्था पडक्या वाड्यासारखी झाली असून, येथे संपूर्ण जागेवर झाडाझुडपांचे साम्राज्य पसरले आहे. प्रशिक्षण व भेट केंद्र, कर्मचारी निवासस्थान, रुग्णालयाची इमारत आदी विभागातील इमारतीही शासनाच्या उदासीनतेमुळे मोडकळीस आल्या आहेत.
आंबेत गावातील व जवळच्या वाडी-वस्तींमधील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत याकरिता बॅ.अंतुले यांच्या कारकिर्दीत प्राथमिक शाळांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, अंतुले यांच्या पश्चात या प्राथमिक शाळांची अवस्था दयनीयच झाली आहे. १९६० ते १९७० या दशकात आंबेत उर्दू शाळा व आंबेत मराठी शाळा या दोन शाळांचे बांधकाम करण्यात आले.
या शाळांची अवस्था धोकादायक झाली आहे. आंबेतकोंड येथील तीन वर्गखोल्यांची शाळा इमारत जुलै २०१६ च्या अतिवृष्टीमध्ये कोसळली. एक वर्ष उलटले तरी या शाळेच्या इमारतीची दुरुस्ती नाही.
शाळेच्या दुसऱ्या इमारतीचे छप्पर गेल्या जानेवारी महिन्यात कोसळले. छप्पर रात्री कोसळल्याने या शाळेत शिकणाºया ५० विद्यार्थ्यांना कोणतीही इजा झाली नाही.
पन्नास वर्षे जुन्या शाळांच्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करणे अनिवार्य असताना ते देखील करण्यात आलेले नाही. कोसळलेल्या शाळा इमारतीच्या दुरुस्तीकरिता एक वर्षानंतर दीड लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात दुरुस्ती कामास अद्याप प्रारंभ झालेला नाही.
>आंबेत एसटी बसस्थानकाची
दुरवस्था
संपूर्ण म्हसळा तालुक्यातील सहा एकर जागेत आंबेत एसटी बस स्थानक उभारण्यात आले आहे. ६ मार्च १९८७ रोजी या एसटी बस स्थानकाचे उद्घाटन तत्कालीन परिवहन मंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले. मात्र अवघ्या तीस वर्षांतच या इमारतीची देखभालीअभावी दयनीय अवस्था झाली आहे.
बसस्थानकात दररोज येणाºया व जाणाºया मिळून १२० बस फेºया होत असतात. बस स्थानकात प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सुविधा देखील नाही.
बस स्थानकामध्ये कँटीन, चालक-वाहक विश्रांतीगृह देखील आहे, परंतु एसटी महामंडळाच्या दुर्लक्षामुळे ते उपयुक्ततेचे राहिलेले नाही.
बसस्थानकाची इमारत पूर्णपणे जीर्ण झाली असून लोखंडी रॉड स्लॅबमधून बाहेर पडलेले आहेत.
अतिवृष्टीमध्ये बसस्थानकाची ही इमारत कोसळू शकते अशी अवस्था झाली असूनही दुरुस्तीबाबतची कोणतीही योजना अमलात आणण्यात आलेली नाही.
शासनाने आंबेत विभागावर मोठा अन्याय केला असून येथे कोणीही डॉक्टर अथवा कर्मचारी येत नसल्याने येथील नागरिकांना विशेष करून स्त्रियांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. आंबेत येथील शासकीय जागेत प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे, जेणेकरून सरकारी दरामध्ये येथील गरीब जनतेस उपचार मिळू शकेल.
- सरस्वती आंबेकर, सरपंच, आंबेत ग्रामपंचायत
बॅ.अंतुले यांच्या शब्दाखातर आमच्या कुटुंबीयांनी आरोग्यसेवेसाठी शासनाला जागा उपलब्ध करून दिली. काही वर्षे आंबेत आरोग्य उपकेंद्र चालले. मात्र, गेली १५ वर्षे आंबेत विभागावर शासनाकडून अन्याय होत आहे. आम्ही शासनास दिलेल्या जागेचा गरीब जनतेच्या हितासाठी वापर व्हावा हीच आमची बॅ.अंतुले साहेबांना खरी श्रद्धांजली असेल.
- फारु क उभारे, माजी सरपंच, आंबेत ग्रामपंचायत
आंबेत विभागातील गोरगरीब जनतेवर शासनाच्या दुर्लक्षामुळे मोठा अन्याय होत आहे. येथील दवाखाना बंद झाल्यापासून खासगी दवाखान्यांचे पेव फुटले आहे. बेफाट फी आकारून गोरगरीब जनतेची फसवणूक होत आहे. शासनाने आरोग्य सेवेत लक्ष घालून आंबेत येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित करून आंबेत व जवळपासची २० गावे आणि ३० वाड्यांमधील ग्रामस्थांना आरोग्य सेवा देणे अत्यंत गरजेचे आहे.
- नविद अंतुले, ग्रामस्थ आंबेत

आंबेत येथील बसस्थानकाच्या दुरवस्थेबाबत पेण विभागीय कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला असून, तेथील असणारे सर्व प्रश्न सोडवण्याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत.
- चेतन देवधर, एसटी आगार व्यवस्थापक, महाड आगार
संबंधित कर्मचारी जे सुविधा देण्यात कसूर करीत आहेत त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात येतील व त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येईल.
- डॉ. सुरेश तडवी, म्हसळा तालुका आरोग्य अधिकारी
पन्नास वर्षे जुन्या शाळांच्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करणे अनिवार्य असताना ते देखील करण्यात आलेले नाही.

Web Title: Acne eclipse problems in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.