जम्बो कोविड केअर सेंटरसाठी जागेचे अधिग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 12:43 AM2021-04-23T00:43:52+5:302021-04-23T00:44:04+5:30
पनवेल परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जम्बो कोविड केअरची मागणी पुढे आली. रु
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेलमध्ये जम्बो कोविड केअर उभारण्याच्या हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेने पाठविलेल्या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळंबोली येथील भारतीय कपास निगमचे गोदाम अधिग्रहण करण्यास मंजुरी दिल्यानंतर महसूल विभागाने हे गोदाम ताब्यात घेतले आहे.
पनवेल परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जम्बो कोविड केअरची मागणी पुढे आली. रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड खासगी उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना तत्काळ उपचार मिळावा म्हणून या भागांमध्ये जम्बो कोविड केअर सेंटर निर्माण करण्याचा प्रस्ताव पनवेल महापालिकेने नगर विकास विभागाकडे पाठवला आहे. त्यानुसार कळंबोली येथील भारतीय कपास निगमची जागा निश्चित करण्यात आली आहे. त्याचबरोबर खारघर १९ येथील केंद्र सरकारने बांधलेल्या नवी आयुष्य हाॅस्पिटलची इमारत अधिग्रहण करून त्या ठिकाणी ही १०० बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. मनपा आयुक्त यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी कळंबोली च्या जागेची पाहणी केली आहे. ही जागा जम्बो कोविड केअर सेंटरकरिता निश्चित करण्यात आली आहे. कळंबोली येथे भारतीय कपास निगम लि. यांच्या मालकीचे विस्तृत गोडाऊन आहे. या ठिकाणच्या पाच गोडावून मध्ये ५०० चे बेडचे कोविड सेंटर सुरू करू शकतो. त्या अनुषंगाने पनवेल महापालिकेने
प्रस्ताव नगर विकास खात्याकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला नगरविकास खात्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर कळंबोली येथील कपास निगमच्या गोडाऊनमध्ये तत्काळ कोरोना सेंटर उभारण्याचे काम सुरू केले जाईल.
८०० खटांच्या जम्बो कोविड केअर सेंटर उभारणीला परवानगी मिळाली आहे. लवकरच निविदा काढून या ठिकाणचे काम पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत जम्बो सेंटर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- सुधाकर देशमुख,
आयुक्त,
पनवेल महानगरपालिका