‘ठेवीदारांचा प्रतिनिधी म्हणून भूमिका मांडणार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 11:54 PM2020-12-20T23:54:36+5:302020-12-20T23:54:58+5:30
Pen : रविवारी खासदार सुनील तटकरे यांनी पेण शहरात धावती भेट दिली.
पेण : पेण अर्बन बँकेत ठेवीदारांचा एक प्रतिनिधी या भूमिकेतून समस्या सोडविण्याचे काम करणार, अशी ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी पेण येथील कार्यक्रमात दिली.
रविवारी खासदार सुनील तटकरे यांनी पेण शहरात धावती भेट दिली. तेंव्हा पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी खा. तटकरे यांची भेट घेऊन त्यांना बँकेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावेत यासाठी निवेदन दिले. खासदार तटकरे यांनी मागच्या संसदीय अधिवेशनात पेण अर्बन बँकेला भूमिका मांडण्याची संधी मला मिळाली, यावेळी मी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण व अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे पेण अर्बन बँकेचे सक्षम बँकेत विलीनीकरण करावे, अशी मागणी केली होती. याचा पाठपुरावा सुरू असून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले. पेण अर्बन बँकेची याबाबत ठोस भूमिका मांडण्यासाठी विविध कागदaपत्रांची पूर्तता करून सक्षमरीत्या आपले प्रश्न केंद्र व राज्यात मांडण्यात येऊन बँकेचा प्रश्न तडीस नेण्यास मी कटिबध्द आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून आघाडी सरकार केंद्राकडे अर्बन बँकेबाबत लवकर कार्यवाही कशा प्रकारे करता येईल याकडे जातीने लक्ष देतील. यामुळे ज्या ठेवीदारांचे पैसे पेण बँकेत अडकले आहेत त्यांना निश्चित न्याय मिळवून देण्याचे काम करणार असल्याचे स्पष्ट केले.