नोंदीची कामे मार्गी न लावणाऱ्या 14 मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा
By निखिल म्हात्रे | Published: March 15, 2024 02:17 PM2024-03-15T14:17:54+5:302024-03-15T14:18:04+5:30
रायगड जिल्हा वारस नोंदीमध्ये कोकणामध्ये अव्वल ठरला आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये वारस नोंदी, खरेदीखत नोंदी अशा अनेक प्रकारची कामे मोठ्या प्रमाणात केली जातात.
लोकमत न्युज नेटवर्क
अलिबाग - खरेदीखत नोंदीच्या कामात विलंब करणाऱ्या जिल्ह्यातील 14 मंडळ अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दणका देण्यात आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप शिर्के यांनी ही कारवाई केली असून, त्यांच्यावर तहसील कार्यालयातील अन्य कामाचा भार सोपविण्यात आला आहे.
रायगड जिल्हा वारस नोंदीमध्ये कोकणामध्ये अव्वल ठरला आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये वारस नोंदी, खरेदीखत नोंदी अशा अनेक प्रकारची कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. परंतु, तलाठ्यांसह मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात हा प्रस्ताव गेल्यावर दोन महिन्यांपासून सहा महिने नोंदीसाठी वाट पाहावी लागत आहे. मंडळ अधिकाऱ्यांकडून वेळेवर नोंदी होत नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लक्षात आले. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी याबाबत कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. तीस दिवसांच्या आत नोंदीची कामे मार्गी न लावणाऱ्या जिल्ह्यातील 14 मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा सुरु केला आहे.
जासई, म्हसळा, पोयजे, कर्जत, पेण ग्रामीण, नागाव, कोप्रोली, वाळवंटी, खामगाव, माघरुण, वाकण, कामार्ली, मोर्बे व मुरुड येथील मंडळ अधिकाऱ्यांचा समावेश असून, या सर्वांच्या बदल्या अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय अभिलेख कक्षात एक आठवड्यासाठी करण्यात आल्या आहेत.