अटल सेतूवरील १४४ सेल्फी बहाद्दरांवर कारवाईचा बडगा; नियम पाळण्याचे केले आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 11:42 AM2024-01-15T11:42:34+5:302024-01-15T11:43:14+5:30
नियमांचे पालन करा, न्हावा-शेवा वाहतूक नियंत्रण पोलिस शाखेने खडसावले
मधुकर ठाकूर
उरण: अटल सेतूच्या उद्घाटनानंतर सेतूवरच सेल्फी काढण्यासाठी वाहने थांबवून वाहतूकीस अडथळा निर्माण करणाऱ्या १४४ सेल्फी बहाद्दरांवर न्हावा-शेवा वाहतूक नियंत्रण पोलिस शाखेने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.सेतूवरून प्रवास करताना नियमबाह्य वर्तन करणाऱ्यांविरुद्ध आणखी कठोर कारवाई करण्याचा इशाराही न्हावा-शेवा वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जी.एम. मुजावर यांनी दिला आहे.
अटल सेतूचे उद्घाटन १२ जानेवारी रोजी झाले आहे. या पुलावर दुचाकी व तीन चाकी वाहनास प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.तसेच या सेतूवर चार चाकी वाहनांसाठी वेग-मर्यादा १०० किलोमीटर प्रति तास इतकी ठेवण्यात आली आहे. तसेच या पुलावर कोणत्याही परिस्थितीत विनाकारण थांबण्यास व वाहन पार्क करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र असे असतानाही अनेक वाहन चालक त्यांची वाहने अटल सेतूवर पार्क करून वाहनातून खाली उतरून सेल्फी काढण्यात तसेच फोटो काढण्यामध्ये व्यस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. या गंभीर प्रकारामुळे भविष्यात एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अशा वाहन चालकांच्या बेशिस्त वर्तणुकीला आळा घालण्यासाठी रविवारी (१४) संध्याकाळपासून रात्री पर्यंत न्हावा-शेवा वाहतूक शाखेच्या पथकाने शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जी.एम.मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कडक तपासणी केली.या तपासणीत विनाकारण अटल सेतूवर वाहने पार्क करून सेल्फी काढणाऱ्या व रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या एकूण १४४ वाहन चालकांविरुद्ध मोटर वाहन कायद्याप्रमाणे प्रत्येकी रु.५०० ते १५०० इतक्या रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जी.एम.मुजावर यांनी दिली.
अटल सेतूवर नियमबाह्य वाहतूकीला आळा घालण्यासाठी दोन गस्ती पथकेही तैनात करण्यात आली आहेत. या पथकामार्फत अटल सेतूवर सेल्फी काढण्यासाठी अथवा विनाकारण थांबलेल्या वाहनचालकांवर बाजूला काढले जात आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध सतत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
अटल सेतूवरुन प्रवास करणाऱ्या प्रवासी व वाहनचालकांनी विनाकारण त्यांचे वाहने पार्क करू नयेत, रहदारीस अडथळा होईल असे वर्तन करू नये असे आवाहन न्हावा-शेवा वाहतूक शाखा, नवी मुंबई तर्फे सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.मात्र बेशिस्त व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या विरोधात आणखी कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशाराही न्हावा-शेवा वाहतूक शाखेच्या वतीने वपोनि जी.एम.मुजावर यांनी दिला आहे.