सावित्रीच्या खाडीपात्रातील रेतीमाफियांवर मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2018 08:52 PM2018-06-08T20:52:37+5:302018-06-08T20:53:43+5:30
रायगड-रत्नागिरीच्या सीमेवरील धडक कारवाईनं माफियांचे धाबे दणाणले
रायगड : सावित्री नदीच्या समुद्राकडील खाडीपात्रात म्हाप्रळ-आंबेत परिसरात बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. रायगड व रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर चोरट्या मार्गानं बंद स्थितीत उभे असलेले चार सक्शन पंप पाण्यात बुडवण्यात आले. तर एक सक्शन पंप म्हसळा तहसील कार्यालयानं जप्त केला. महसूल विभागाच्या विशेष पथकाच्या या धडक कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
रत्नागिरी जिल्हा खनिकर्म अधिकारी मिनाक्षी माने, दापोली उपविभागीय महसूल अधिकारी जयराम देशपांडे यांच्या उपस्थितीत धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अवैधरित्या पंप लावून वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. मंडणगड तहसीलदार प्रशांत पानवेकर, म्हसळा तहसीलदार जयराज सुर्यवंशी, मंडणगड पोलीस निरीक्षक उत्तम पिठे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस.के. जाधव, महसूल कार्यालयातील पथकाचे श्याम जवळगे, विनोद पारधे यांचे पथक बोटीच्या मदतीने पाण्यात गस्त घालण्यासाठी नदीपात्रात उतरलेले होते. यावेळी केलेल्या कारवाईत म्हाप्रळ आंबेत परिसरात रायगड जिल्ह्याचे सीमेवर चार संक्शन पंप बांधून ठेवल्याचे आढळून आले. ते बोटीने नदीपात्राबाहेर काढणे शक्य नसल्यानं पाण्यात बुडवण्यात आले. तर एक मोकळा असलेला सक्शन पंप जप्त करून खाजगी बोटीनं किनारी आणून म्हसळा तहसील कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आला आहे. या कारवाईनंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान अवैध वाळू साठ्यावरही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये दोन ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी साठेबाज नाहीर मांडलेकर याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
गुरुवारी दुपारी साडेचार वाजता गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्शन पंप चालक व मालक यांनी शासनाची परवानगी नसताना आंबेत हद्दीतील सावित्री बाणकोट खाडीमध्ये अवैधरित्या वाळू उत्खनन करून रेती चोरण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी एक लोखंडी सक्शन पंप व बोट असा एकूण चार लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी गोरेगाव पोलीसांनी भा.द.वि.कलम 379,511, महाराष्ट जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 अन्वये गुन्हा केला असून पुढील तपास करण्यात येत आहे.