चुकीचे, खोटे पंचनामे केल्यास कारवाई; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 04:21 AM2020-07-02T04:21:00+5:302020-07-02T04:21:17+5:30
कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनला गुरुवारी १०० दिवस पूर्ण होत आहेत. तसेच निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
रायगड : खोटे अथवा चुकीचे पंचनामे करुन कोणी मदत लाटण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिला. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनला गुरुवारी १०० दिवस पूर्ण होत आहेत. तसेच निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. निसर्ग वादळात घरांचे मोठ्या संख्येने नुकसान झाले आहे. त्यातील ७६ टक्के नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरीत मदत लवकरच देण्यात येईल. काही ठिकाणी सात बारावर अधिक नावे असणे, बँकेतील खाते नंबर चूकीचा असणे अशा काही तांत्रीक चुकांमुळे मदत मिळण्यास अडचण येत आहे. मात्र नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. मासेमारी बोटींचे, जाळ्याचे नुकसान झाले आहे. त्यांच्यासाठी निधीची गरज असल्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.
कोरोनाचा धोका वाढत आहे. प्रशासनाने तीन हजार खाटांचे नियोजन केले आहे. १०० दिवस नागरिकांनी साथ दिली आता पुढील १०० दिवस कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करावे, तरच आपण कोरोना विरोधातील युध्द जिंकू असेही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे उपस्थित होते.
कोरोनामुळे लॉकडाऊन हा उपाय नाही
- लॉकडाऊन आणि कंपनी बंद करणे हा कायमस्वरुपी उपाय नाही. त्यामुळे लॉकडाऊन करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जेएसडब्ल्यू, सुदर्शन दिपक फटीर्लायझर, रिलायन्स अशा विविध कंपन्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यासाठी त्या कंपन्यांच बंद करणे योग्य ठरणार नाही.
- तसे केले तर कोरोनामुळे कमी आणि भूकमारीने जास्त मृत्यू होतील असेही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले. खासगी रुग्णालयांनी कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी किमान दोन खाटा राखून ठेवाव्यात. त्याचे बिल महात्मा फुले जन आरोग्य अभियान योजनेतून देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
१२ जुलैपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होणार
माणगाव, म्हसळा, रोहा आणि श्रीवर्धन तालुक्यातील १९० गावांमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे महावितरणचे प्रयत्न सुरू आहेत. ५ जुलैपर्यंत माणगाव, म्हसळा, रोहा तर श्रीवर्धन तालुक्यात १२ जुलैपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.