पर्यटकांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 11:28 PM2019-05-31T23:28:36+5:302019-05-31T23:28:52+5:30
माथेरान नगरपरिषद, अश्वपाल संघटनांचा पुढाकार
कर्जत : थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये वर्षभर लाखो पर्यटक येतात. शहराच्या प्रवेशद्वारापासूनच दररोज पर्यटकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणेने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, पर्यटकांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका या वेळी घेण्यात आली आहे.
माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी पर्यटकांची फसवणूक थांबविण्यासाठी ‘मी माथेरानकर’ म्हणून सोशल मीडियावर माथेरानचे पर्यटन वाचविण्याकरिता नागरिकांनाच आवाहन केले आहे, तर स्थानिक अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशा कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन घोड्यावर बसलेल्या पर्यटकांनाच थेट आपल्याकडून किती पैसे घेतले? अशी विचारपूस करत जास्त पैसे उकळणाºया अश्वचालकांचे व्हिडीओ चित्रीकरण करत सोशल मीडियावर प्रसारित करून पोलिसांना दोषी लोकांवर कायदेशीर कारवाई करा, असे आवाहन केले आहे.
येणाऱ्या पर्यटकांची फसवणूक करून जास्त पैसे उकळणाºया घोडेवाल्यांवर अंकुश ठेवण्यासाठी नगरपरिषदेने एक आराखडा तयार केला आहे. त्यात काही नियम-अटींचा समावेश केला असून सदर तो जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीकरिता पाठवली आहे. त्याला मान्यता मिळताच येथील पर्यटनला बाधा आणणाऱ्या दोषींवर कडक केली जाईल. - प्रेरणा सावंत, नगराध्यक्षा, माथेरान नगरपरिषद
माथेरान ही आमची जन्मभूमी बरोबर कर्मभूमी आहे. येथील बहुतांश लोकांचे जीवन पर्यटनावर अवलंबून आहे. ठरावीक लोक माथेरानमध्ये उदरनिर्वाहाच्या नावाखाली राजरोसपणे पर्यटकांची फसवणूक करत आहेत. यामुळे येथील पर्यटन धोक्यात आले आहे. अशा व्यक्तींना संघटना पाठीशी घालणार नाही व दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. - आशा कदम, अध्यक्षा, स्थानिक अश्वपाल संघटना