उरण : बंदी असतानाही रात्री एलईडी दिव्यांवर अनधिकृतपणे मासेमारी करणाऱ्या पाच मच्छीमार बोटींवरील लाखोंचे किमती साहित्य जप्त करण्यात आले आहे. उरण परिसरातील समुद्रात रायगड मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रभारी साहाय्यक आयुक्त रत्नाकर राजम यांच्या मार्गदर्शनाखाली उरणचे अधिकारी स्वप्निल दाभाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
राज्यातील मच्छीमारांना विविध समस्यांनी ग्रासले आहे. राज्याच्या सागरी हद्दीत नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून जनरेटरचा वापर करून बंदी असतानाही रात्री एलईडी दिव्यांवर अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जात आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने आणि प्रगतशील मच्छीमारी करणाऱ्यांवर भर समुद्रात वाद, तंटे निर्माण होतात. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे एलईडी दिव्यांवर मासेमारी करणाºया मच्छीमारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. मच्छीमारांच्या तक्रारीनंतर, रायगड फिशरिज विभागाने, एलईडी दिव्यांनी अनधिकृतपणे मासेमारी करणाºयांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.उरण सागरी परिसरातून दोन दिवसांत एलईडी दिव्यांवर अनधिकृतपणे मासेमारी करणाºया पाच मच्छीमार बोटींवर कारवाई करण्यात आली आहे. या जप्तीत मच्छीमारांकडून लाखो रुपये किमतीचे साहित्य ताब्यात घेण्यात आल्याची माहिती रायगड मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रभारी साहाय्यक आयुक्त रत्नाकर राजम यांनी दिली. सदर प्रकरणी तहसील तथा दंडाधिकारी कार्यालयात सुनावणीनंतर दोषींवर दंडात्मक कारवाई केली जात असल्याची माहितीही राजम यांनी दिली.