समुद्र किनारी वाहन चालविल्यास कारवाई, रायगड पोलिसांची तंबी
By निखिल म्हात्रे | Published: October 10, 2023 11:06 PM2023-10-10T23:06:32+5:302023-10-10T23:06:49+5:30
रविवारी घडलेल्या घटनेमुळे पोलिसांनी घेतली खबरदारी
निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: समुद्र किनारी वाहन चालविणाऱ्या बेदरकार वाहन चालकांवर रायगड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. वरसोली समुद्र किनाऱ्यावर दुचाकी चालविणाऱ्या एका दुचाकीस्वारावर पोलिसांनी कारवाई केली आहे.
रविवारी सायंकाळी 6:45 वा.च्या सुमारास अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत मौजे वरसोली समुद्र किनारी बिकास पुन्नू चव्हाण वय-20 वर्ष सध्या रा.बुरुमखान वरसोली ता.अलिबाग, मूळ रा.भिवंडी जि.ठाणे याने त्याच्या ताब्यातील बजाज डिस्कव्हर मोटार सायकल नं.एमएच-04-FL-1506 ही वरसोली समुद्र किनारी सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविण्यास मनाई असताना पर्यटकांच्या जिवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करून भरधाव वेगात वाहन चालविताना मिळून आले.
याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे भा.द.वि.कलम 279 सह मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोना अमर जोशी हे करीत आहे. अलिबाग समुद्रकिनारी मनाई क्षेत्रात कोणीही दुचाकी , चारचाकी वाहने चालविताना मिळून आल्यास त्यांच्यावर अशाच प्रकारची कारवाई करण्यात येईल म्हणून अलिबाग नागरिक व पर्यटकांनी समुद्रकिनारी मनाई क्षेत्रात वाहन घेवून जाताना सावधान रहावे असे आवाहन रायगड पोलिसांनी केले आहे.