कामोठेतील हुक्का पार्लरवर कारवाई, सात जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 04:12 AM2018-08-13T04:12:32+5:302018-08-13T04:12:44+5:30
कामोठे परिसरातील हुक्का पार्लरवर पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी कारवाई करण्यात आली. या वेळी सात जणांना ताब्यात घेतले.
कळंबोली - कामोठे परिसरातील हुक्का पार्लरवर पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी कारवाई करण्यात आली. या वेळी सात जणांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, कामोठे आणि परिसरात वाढत्या हुक्का पार्लरबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत पोलिसांनी रविवारी ही कारवाई केली.
गेल्या दोन वर्षांपासून खारघरमधील हुक्का पार्लरचे लोण कामोठे वसाहतीत पोहोचले आहे. खारघरहून महाविद्यालयीन तरुण- तरुणी हुक्का ओढण्यासाठी कामोठेत येत आहेत. सायंकाळच्या वेळी तर येथील हुक्का पार्लर तरुणाईने हाउसफुल्ल होत असते. याचा आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होत आहे. विशेष म्हणजे, संबंधित सोसायटीतील रहिवाशांनी या हुक्का पार्लरला विरोध दर्शवला होता; परंतु त्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या संदर्भात स्थानिक नगरसेविका हेमलता रवि गोवारी या गेल्या सहा महिन्यांपासून महानगरपालिका, पोलीस, कामगार उपायुक्तांकडे पाठपुरावा करीत होत्या; परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे गोवारी यांनी ९ आॅगस्ट रोजी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन दाद मागितली होती. तसेच नवी मुंबईचे नव्याने रुजू झालेले पोलीस आयुक्त संजय कुमार, उपायुक्त अशोक दुधे यांच्याकडेही तक्रार केली होती. रविवारी सकाळी कामोठेतील हुक्का पार्लरवर धाडी टाकल्या. या कारवाईत सात युवकांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.