कर्जतमध्ये नगरपरिषदेची फेरीवाल्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 01:32 AM2019-06-13T01:32:59+5:302019-06-13T01:33:12+5:30
कर्जत : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते कपालेश्वर मंदिर या रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाल्यांवर नगरपरिषदेने कारवाई केली. यामुळे आता ...
कर्जत : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते कपालेश्वर मंदिर या रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाल्यांवर नगरपरिषदेने कारवाई केली. यामुळे आता रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. हा रस्ता नगरपरिषदेने नो हॉकर्स झोन म्हणून काही वर्षांपूर्वी जाहीर केला होता, तसा ठराव नगरपरिषदमध्ये आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेरीवाल्यांनी बस्तान मांडले होते.
या फेरीवाल्यांच्या सामानामुळे रस्त्यावरून येणारी-जाणारी वाहने आणि पादचारी यांना अडचण होत होती. याबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या. मात्र, नगरपरिषद प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत होते. मात्र, मंगळवार, ११ जून रोजी नगरपरिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या फेरीवाल्यांना उठवले आहे. हे फेरीवाले ही जागा आपल्याच मालकीची आहे या भावनेतून वर्षोनुवर्षे ठाण मांडून बसत आहेत. यामधील अनेक फेरीवाल्यांनी दुकानाचे गाळे घेतले आहेत. ते गाळे अन्य व्यापाऱ्यांना भाड्याने दिले आहेत, अशी माहिती मिळाली. तर या रस्त्यावरील काही दुकानदार या फेरीवाल्यांकडून दिवसाचे भाडे घेत आहेत. म्हणजे रस्ता नगरपरिषद मालकीचा अन् भाडे घेतो दुकानदार, अशी परिस्थिती आहे.