बेदरकार वाहन चालकांवर डिजिटल चलनाद्वारे कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:58 PM2019-04-08T23:58:36+5:302019-04-08T23:58:40+5:30
रायगडमध्ये ‘एक राज्य एक ई-चलान’ योजना
अलिबाग : महाराष्ट्र राज्यात मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करताना कारवाईमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व वाहन चालकांवर डिजिटल चलनाद्वारे कारवाई करण्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये सोमवारपासून ‘एक राज्य एक ई-चलान’ ही योजना राबविण्यात आली आहे.
या आधुनिक कार्यप्रणालीअंतर्गत शासनाकडून दिलेले डिव्हाईस हे अॅन्ड्रॉईड मोबाइलसारखे असून त्यास ब्लूटूथद्वारे कनेक्ट करण्यासाठी प्रिंटर दिलेला आहे. ही ई-चलन कार्यप्रणाली पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर व अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांच्या अधिपत्याखाली वाहतूक विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष राबवीत आहेत.
शासनाकडून प्राप्त असलेल्या माहितीनुसार दिलेल्या डिव्हाईसमध्ये नवीन व वेगवेगळे मोबाइल अॅप्स अद्ययावत करण्यात आलेले असून एखाद्या वाहन चालकाने महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी मोटार वाहन कायद्याचा भंग केल्यास व तो वाहन चालक दुसऱ्या ठिकाणी सापडल्यास,त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक अधिकारी वा कर्मचाऱ्याने त्याचा वाहन नंबर अॅप्समध्ये टाकल्यास त्या वाहनाने यापूर्वी मोटार वाहन कायद्याचा भंग केलेल्या सर्व नियमांचा तडजोड तपशील त्या वाहतूक अधिकारी वा कर्मचाºयास दिसेल. त्यावेळी त्या वाहन चालकाला त्याने यापूर्वी भंग केलेल्या नियमांच्या तडजोड शुल्काची रक्कम भरण्यास तो बांधील राहील. तसेच वाहन चालकाने चारचाकी वाहनाचा नंबर हा दुचाकी वाहनास दिला असल्यास तसा संदेश लगेच डिव्हाईसवर दिसणार आहे.
या कार्यप्रणालीमध्ये तडजोड शुल्काची रक्कम ही वाहन चालकास महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी रोख स्वरूपात तसेच एटीएम कार्ड स्वाइप करून तसेच आॅनलाइन पेमेंटद्वारे भरता येणार आहे. कारवाईदरम्यान कसुरदार वाहन चालकास मोटार वाहन कायद्याच्या कोणत्या नियमाचा भंग केला आहे. त्याचा व त्याबाबत तडजोड शुल्क भरल्याचा संदेश (एसएमएस) वाहन चालकाच्या मोबाइलवर दिसणार आहे. तसेच त्याची वाहन चालकाने पावती मागितल्यास त्यास पावती देखील मिळणार आहे.