वर्षभरात १,८७३ वाहनचालकांचे परवाने निलंबित, पनवेल परिवहन विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 01:58 AM2020-01-26T01:58:47+5:302020-01-26T01:58:58+5:30
प्रादेशिक परिवहन विभागाच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी ही कारवाई केली आहे.
पनवेल : वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या १,८७३ वाहनचालकांचे परवाने पनवेल परिवहन विभागातर्फे निलंबित करण्यात आले आहेत. २०१९ ही कारवाई करण्यात आली आहे. पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी ही कारवाई केली आहे. मागील वर्षाच्या १ एप्रिल ते ३१ डिसेंबर या आठ महिन्यांच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये दुचाकी, चारचाकी, ट्रक, रिक्षा, टेम्पो, मालवाहू वाहन चालकांचा समावेश आहे. वाहतुकीच्या नियमांबाबत परिवहन विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते, तरीसुद्धा वाहनचालक वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत सर्रास हे नियम पायदळी तुडवत असतात. अशा वाहनचालकांविरोधात हे सक्त पाऊल उचलण्यात आले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली. यामध्ये मद्यपान करून वाहन चालवणे, ओव्हर स्पिडिंग, गाडी चालविताना मोबाइलवर बोलणे या प्रामुख्याने कारणांचा समावेश आहे. प्राथमिक स्वरूपात वाहन परवाने ९० दिवस निलंबित केले जातात. मात्र, वारंवार या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात येत आहेत. मात्र, अद्याप तरी एकही परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला नसल्याचे पाटील याची स्पष्ट केले.
मागील वर्षी २०१८ मध्ये २,८९० परवाने रद्द करण्यात आले होते. तर २०१७ मध्ये ही संख्या ४०२ एवढी होती. पनवेल परिवहन कार्यालयाची व्याप्ती वाढत आहे. पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत पनवेल, उरण, खालापूर आणि कर्जत या शहरांचा समावेश आहे, त्यामुळे दिवसागणिक वाहनांच्या संख्येत मोठ्या संख्येने भर पडत आहे.
वाहचालकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, याकरिता ही कारवाई करण्यात आली आहे. १,८७३ वाहनचालकांचे परवाने केवळ ९० दिवसांपुरते निलंबित आहेत. याच नियमांचे उल्लंघन केल्यास या वाहनचालकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात येतील.
- हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल