- सिकंदर अनवारे
दासगाव : गेल्या वर्षभरापासून महामार्ग वाहतूक शाखा पोलिसांकडून महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जात आहे. अशाच प्रकारे महामार्ग वाहतूक शाखा पोलीस महाड यांनी गेल्या अकरा महिन्यात १५ हजार ४१२ वाहनांवर कारवाई केली असून ५५ लाख ४३ हजार रुपये दंड ठोठावला आहे. यामधून ५ लाख ८४ हजार ६०० रुपये वसूल केले आहे. तर ४९ लाख ५८ हजार ४०० रुपये हे कोरोनामुळे अनपेड आहेत. जरी अनपेड असले तरी हे वाहन मालकांकडून वसूल केले जाणार आहेत.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून दर दिवशी हजारो वाहने ये-जा करत असतात. अनेक वाहने नेहमी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत असतात. वाहतूक सुरळीत ठेवणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे. यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर जवळपास ५५० किलोमीटर अंतरामध्ये ८ वाहतूक पोलीस शाखा उभारण्यात आल्या आहेत.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन; लाखो वाहनांची तपासणीगेल्या ११ महिन्याच्या कालावधीमध्ये महामार्ग वाहतूक शाखा पोलिसांनी लाखो वाहनांची तपासणी केली. १५ हजार ४१२ वाहने ही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारी सापडली, त्यामध्ये सीट बेल्ट न लावणे, वाहनांचे इन्शुरन्स नसणे, वाहन चालवण्याचा परवाना नसणे, वाहनांची पीयुसी नसणे, भरधाव वेगात वाहन चालवणे, काळ्या काचांचा वापर करणे आणि मोटरसायकलवर हेल्मेटचा वापर न करणे, नियमाचा उल्लंघन करणाऱ्या अशा वाहनांवर कारवाई केली.
एप्रिल महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊनला सुरुवात झाली. कोरोनाच्या भीतीने एप्रिल महिन्यात वाहनांची तपासणी बंद ठेवली होती. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत ज्या वाहनांवर कारवाई झाली त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. मात्र एप्रिलपासून कोरोनाला सुरुवात झाल्याने कारवाईनंतर ती रक्कम वाहन मालकांवर पेंडिंग ठेवण्यात आली आहे.