लाचखोर दुय्यम निबंधकावर कारवाई, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 01:16 AM2020-12-23T01:16:49+5:302020-12-23T01:17:08+5:30

bribe case : तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे जमीन खरेदी दस्त नोंदणीकरिता खालापूर येथील दुय्यम निबंधक सुरेंद्र गुप्ते (५३, सध्या रा. कर्जत, मूळ राहणार जि.नाशिक) याने तक्रारदाराकडे ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.

Action taken against bribe-taking secondary registrar, bribery squad arrested | लाचखोर दुय्यम निबंधकावर कारवाई, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले

लाचखोर दुय्यम निबंधकावर कारवाई, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले

googlenewsNext

अलिबाग : जमीन खरेदीच्या दस्त नोंदणीकरिता लाच स्वीकारणारा खालापूरचा लाचखोर दुय्यम निबंधक सुरेंद्र गुप्ते याला रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. सोमवारी, २१ डिसेंबर रोजी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी नाशिक येथील ५१ वर्षीय तक्रारदाराने तक्रार दिली होती.
तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे जमीन खरेदी दस्त नोंदणीकरिता खालापूर येथील दुय्यम निबंधक सुरेंद्र गुप्ते (५३, सध्या रा. कर्जत, मूळ राहणार जि.नाशिक) याने तक्रारदाराकडे ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती साडेतीन लाख रुपये देण्याचे ठरले. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. सोमवारी २१ डिसेंबर रोजी सापळा रचण्यात आला होता. यावेळी दुय्यम निबंधक सुरेंद्र गुप्ते याला १ लाख रुपयांची लाच घेताना पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईने गुप्ते याची भंबेरी उडाली. त्याच्याकडून लाचेची १ लाख रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली. डीवायएसपी सुषमा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पो.नि. रणजीत गलांडे, पोलीस हवालदार, दीपक मोरे, बळीराम पाटील, विशाल शिर्के, विश्वास गंभीर, पोलीस नाईक सूरज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लाच मागितल्यास येथे करा तक्रार
कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खासगी व्यक्तीने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास, रायगड अँटी करप्शन ब्युरोकडे दूरध्वनी क्र. ०२१४१-२२२३३१ किंवा मोबाइल क्रमांक ८१६९३४५३८५ किंवा १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. 

Web Title: Action taken against bribe-taking secondary registrar, bribery squad arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड