अलिबाग शहरातील जागेवर अतिक्रमण करणाऱ्या गजरे व्यावसायिकावर कारवाई; नगरपरिषदेची कारवाई
By राजेश भोस्तेकर | Published: December 22, 2022 12:08 PM2022-12-22T12:08:12+5:302022-12-22T12:09:14+5:30
अलिबाग शहरातील मुख्य रस्त्यावर अनधिकृतपणे फुटपाथची जागा वापरून गजरे विकणाऱ्यावर नगरपरिषदेच्या अतिक्रमण पथकाने कारवाईचा बडगा उचलला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग :अलिबाग शहरातील मुख्य रस्त्यावर अनधिकृतपणे फुटपाथची जागा वापरून गजरे विकणाऱ्यावर नगरपरिषदेच्या अतिक्रमण पथकाने कारवाईचा बडगा उचलला आहे. त्यामुळे हा फुटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळा झाला आहे. अलिबाग नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे याच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र ही कारवाई केल्यानंतर पुन्हा याठिकाणी अतिक्रमण होऊ नये याची जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.
अलिबाग शहरातील एस टी आगाराच्या बाहेरील फुटपाथ हा पादचारी यांच्यासाठी बांधण्यात आला होता. मात्र या जागेवर गेली अनेक वर्ष गजरे विकणाऱ्यानी अनधिकृतपणे ताबा मिळवला होता. गजरे विकणाऱ्या कुटुंबांनी आपल्या व्यवसाय सोबत तिथेच आपला संसार थाटला होता. त्यामुळे शहराच्या सुरुवातीलाच गजरे विकणाऱ्याच्या अस्वच्छतेचे प्रतीक उमटलेले दिसायचे. अनेक वेळा या गजरे विकणाऱ्याना या जागेवरून हटविण्यात आले होते. मात्र राजकीय वरदहस्तमुळे पुन्हा त्याचा संसार थाटला जात होता.
अखेर गुरुवारी २२ डिसेंबर रोजी मुख्याधिकारी अंगाई साळुंखे याच्या आदेशाने अतिक्रमण पथकाने ही कारवाई केली. पोलिसांच्या उपस्थितीत बनविलेले अतिक्रमण पथकाने हटवले आहे. त्यामुळे ही जागा मोकळी झाली आहे. पुन्हा याठिकाणी गजरे विकानाऱ्यानी अतिक्रमण करू नये याची दक्षता नगरपरिषदेने ठेवणे आवश्यक आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविणेही गरजेचे
अलिबाग हे पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे अलिबाग शहरात नेहमी पर्यटकांचा राबता असतो. शहरातील रस्तेही नगरपरिषदेने रुंदीकरण करून वाढविलेले आहेत. मात्र रुंद झालेल्या रस्त्यावर फळ विक्रेते, दुकानदार यांनी आपली दुकाने थाटून वाहतूक कोंडीला अडथळा केलेला आहे. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी समस्या नेहमीच उद्भवत असते. त्यामुळे नगरपरिषदेने अनधिकृतपणे अतिक्रमण केलेले रस्ते मोकळे करणे गरजेचे आहे. मात्र याकडे प्रशासनाचे जाणूनबुजून दुर्लक्ष होताना दिसत आहे. रस्ते मोकळे करण्यासाठी ठोस कारवाई प्रशासनाने हाती घेणे गरजेचे आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"